चिपळूण : शहरानजीकच्या खेर्डी औद्योगिक वसाहतीतील रफीक मेमन यांच्या भंगार गोडावूनला भीषण आग लागल्याची घटना शुक्रवारी रात्री ११.३० वाजता घडली. या आगीत लाखोंचे नुकसान झाले आहे. सुदैवाने नागरिकांच्या सर्तकतेमुळे दोघेजण बचावले.
गेल्या अनेक दिवसांपासून खेर्डी औद्योगिक वसाहतीतील भंगार व्यावसायिकांचे प्रमाण वाढले आहे. येथे चार कारखानदार असले तरी एकूण मालाची उलाढाल तेवढीच आहे. भंगार गोळा करून क्रश केला जातो. त्यानंतर पॅकींग करून तो मुंबईत पाठवला जातो. अशाच पद्धतीचे गोडावून सुरू होते. मात्र, या गोडावूनला शुक्रवारी रात्री अचानक आग लागली. त्यामध्ये कच्चा मालाच्या स्वरूपात प्लास्टीक व अन्य साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे.
या घटनेची माहिती मिळताच तातडीने नगर परिषद, लोटे औद्योगिक वसाहत व पोफळी येथील अग्निशमन बंब मागवून ही आग आटोक्यात आणण्यात आली. या गोडाऊनच्या आतील भागात असलेला संपूर्ण कच्चा माल जळून खाक झालेल्या असतानाच छताचा भागही पूर्णपणे जळाला आहे. त्यामुळे या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
या गोडावूनच्या आतील भागात दोन कामगार राहतात. शुक्रवारी काम आटोपून ते झोपले होते. मात्र त्याचवेळी गोडाऊनच्या मागील बाजूस मोठी आग लागल्याने काही नागरिकांनी मोठी ओरड केली. त्यामुळे जागे झालेल्या दोन्ही कामगार प्रसंगावधान राखत तेथून बाहेर पळाले.