गुहागर-विजापूर रस्त्याचे दोन दिवसांत काम सुरू न झाल्यास आंदोलन : भरत लब्धे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:32 AM2021-04-09T04:32:57+5:302021-04-09T04:32:57+5:30

चिपळूण : गुहागर-विजापूर मार्गावर रस्ता रुंदीकरण व मजबुतीकरणाचे काम मनीषा कन्स्ट्रक्शन कंपनी करीत आहे. मात्र, काही ठिकाणी काम पूर्ण ...

If work on Guhagar-Bijapur road does not start in two days, agitation: Bharat Labdhe | गुहागर-विजापूर रस्त्याचे दोन दिवसांत काम सुरू न झाल्यास आंदोलन : भरत लब्धे

गुहागर-विजापूर रस्त्याचे दोन दिवसांत काम सुरू न झाल्यास आंदोलन : भरत लब्धे

Next

चिपळूण : गुहागर-विजापूर मार्गावर रस्ता रुंदीकरण व मजबुतीकरणाचे काम मनीषा कन्स्ट्रक्शन कंपनी करीत आहे. मात्र, काही ठिकाणी काम पूर्ण केले नसल्यामुळे अपघात होत आहेत. कंपनीने उर्वरित काम दोन दिवसांत सुरू केले नाही, तर कंपनीची एकही गाडी रस्त्यावर फिरू देणार नसल्याचा इशारा काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष भरत लब्धे यांनी दिला आहे.

याबाबत लब्धे यांनी सांगितले की, गुहागर-विजापूर मार्गावर बहादूर शेख ते पिंपळी बुद्रुक दरम्यान ११ किलोमीटर रस्त्याचे रुंदीकरण व मजबुतीकरण करण्याचे काम मनीषा कन्स्ट्रक्शन यांनी तीन वर्षांपूर्वी सुरू केले. मात्र, गेल्या तीन वर्षांत नियोजनाअभावी योग्य काम झालेले नाही. खेर्डी, सतीचा पूल, काळकाई मंदिर येथील कॅनॉल तसेच पेढांबे पूल येथील कॅनॉलच्या अलीकडील व पलीकडील बाजूचे काम अपूर्ण अवस्थेत आहे. सिमेंट काँक्रीटने तयार केलेल्या रस्त्याला खडबडीतपणा असून, योग्य पातळीत काम झालेले नाही.

मनीषा कन्स्ट्रक्शन कंपनीने अनेक ठिकाणी खोदाई करून योग्य वेळेत काम पूर्ण न केल्यामुळे तीन वर्षांत शेकडो अपघात झालेले आहेत. काही जणांचा मृत्यू, काहीजण जायबंदी झालेले आहेत. नागरिक, वाहन चालक यांना मोठा फटका बसत आहे. या कामाकडे ना अधिकाऱ्यांचे ना ठेकेदाराचे लक्ष आहे. त्यामुळे आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे उर्वरित काम दोन दिवसांत सुरू न झाल्यास मनीषा कन्स्ट्रक्शनची एकही गाडी रस्त्यावर फिरू देणार नसल्याचा इशारा लब्धे यांनी दिला आहे.

Web Title: If work on Guhagar-Bijapur road does not start in two days, agitation: Bharat Labdhe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.