नियमभंगाचा दंड चुकवला तर सातबारावर बोजा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 11:45 AM2021-02-25T11:45:25+5:302021-02-25T11:47:57+5:30
corona virus Ratnagiri-कोरोना संसर्गाचे जिल्ह्यातील वाढते प्रमाण लक्षात घेता नियमांचा भंग केल्याप्रकरणी झालेला दंड लोकांनी चुकवल्यास त्या रकमांचा बोजा त्यांच्या साताबारा उता-यावर चढवला जाईल, असा इशाराही तीन प्रशासकीय विभागांच्या वतीने देण्यात आला आहे.
मंडणगड : कोरोना संसर्गाचे जिल्ह्यातील वाढते प्रमाण लक्षात घेता नियमांचा भंग केल्याप्रकरणी झालेला दंड लोकांनी चुकवल्यास त्या रकमांचा बोजा त्यांच्या साताबारा उता-यावर चढवला जाईल, असा इशाराही तीन प्रशासकीय विभागांच्या वतीने देण्यात आला आहे.
तालुकावासियांनी कोरोना आरोग्य नियमावली व सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन तहसीलदार नारायण वेंगुर्लेकर, पोलीस निरीक्षक सुशांत वराळे, बाणकोट सागरी पोलीस स्थानकाचे निरीक्षक उत्तम पिठे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रभाकर भावठणकर यांनी तालुकावासियांना केले आहे.
तीन प्रशासकीय विभागांच्या वतीने भिंगळोली येथे तहसील कार्यालयात संयुक्त परिषदेत हे आवाहन करण्यात आले. ग्रामीण व शहरी भागांत मास्क वापरणे अनिवार्य करण्यात आले असून, विनामास्क फिरणाऱ्या लोकांना ५०० रुपये इतका दंड आकारण्यात येणार असल्याचे तहसीलदार वेंगुर्लेकर यांनी स्पष्ट केले.
तालुक्यात होणाऱ्या सांस्कृतिक, धार्मिक, सामाजिक कार्यक्रमांसाठी प्रांताधिकारी दापोली यांची पूर्वपरवानगी गरजेची असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. क्रिकेट, कबड्डी, खोखो या खेळांच्या सामान्यांच्या आयोजनावर कटाक्षाने लक्ष ठेवण्यात येणार असून, त्यासाठीही प्रांताधिकाऱ्यांची परवानगी गरजेची आहे. तसेच लग्नकार्यास पन्नासपेक्षा अधिक संख्येने लोक गोळा होणार असल्यास त्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असेही ते म्हणाले.
आंबेत व वाल्मिकीनगर येथील फेरीबोटीवर कोरोना नियमावलीचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच विनामास्क फेरीबोट प्रवेश बंद ठेवण्यात आला आहे. ग्राम व वाडी कृती दल यांचे पुन्हा गठन करण्यात आले आहे. कोरोना नियमावलीचा भंग करणाऱ्या लोकांनी दंड चुकवल्यास त्यांच्या घराचे असेसमेंट अथवा सातबारावर त्या रकमेचा बोजा चढविण्यात येणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
यावेळी निवासी नायब तहसीलदार अभिजित राणे, पोलीस उपनिरीक्षक शहाजी पवार, सहायक पोलीस उपनिरीक्षक सय्यद, नगरपंचायत प्रशासकीय अधिकारी अभिजित राणे हजर होते. नंतर या अधिकाऱ्यांनी शहरात मास्क वाटले.