रत्नागिरी : केंद्र शासनाच्या वतीने नीती आयोगाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमधून स्वतंत्रपणे वैज्ञानिक विचार करणारे, संशोधनवृत्तीचे नागरिक निर्माण व्हावेत, यासाठी अटल टिंकरिंग लॅब हा महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
या उपक्रमासाठी देशातील १३,५00 शाळांपैकी ५०० शाळा निवडण्यात आल्या असून, जिल्ह्यातील दि न्यु एज्युकेशन सोसायटीच्या फाटक हायस्कूलची निवड झाली आहे. या प्रयोगशाळेचे उद्घाटन माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्म दिनाचे औचित्य साधून २५ रोजी करण्यात येणार असल्याची माहिती या संस्थेने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली.यावेळी संस्थेच्या कार्याध्यक्षा अॅड. सुमिता भावे, मुख्याध्यापिका शुभांगी वायकुळ तसेच या प्रयोगशाळेचे प्रमुख राजीव गोगटे उपस्थित होते. ही शाळा २०२० साली शतक पूर्ण करणार आहे. शतक महोत्सवाकडे वाटचाल करीत असतानाच शाळेने हे यश मिळवले आहे. या महत्त्वाकांक्षी उपक्रमासाठी शाळेने विविध निकष, मुलाखती तसेच सादरीकरणात आघाडी घेतल्याने अखेर निवड झाली आहे.या प्रयोगशाळेसाठी संस्थेने जागा उपलब्ध करून दिली आहे. जिल्ह्यातील ही एकमेव प्रयोगशाळा आहे. संस्थाध्यक्ष अॅड. बाबासाहेब परूळेकर, संस्थेचे सर्व पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने नवनवीन उपक्रम राबविणाऱ्या फाटक हायस्कूलच्या वाटचालीतील हा एक मैलाच दगड मानला जात आहे.
या उपक्रमासाठी नीती आयोगाच्या मार्गदर्शनानुसार ८ लाख रूपयांची उपकरणे व साहित्य खरेदी करण्यात आले आहे. यात थ्री डी प्रिंटर, ड्रोन, रोबोटिक्स, कीट्स, इलेक्ट्रॉनिक्स सेंसर आदींचा समावेश आहे. तसेच दरवर्षी २ लाख याप्रमाणे पाच वर्षे या उपकरणांच्या दुरूस्ती व देखभालीसाठी निधी दिला जाणार आहे.
या प्रयोगशाळेच्या माध्यमातून जिल्ह्यातील विविध शाळांच्या सहावी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना विविध प्रयोग करण्याची तसेच त्यातून संशोधनाची संधी आहे. विद्यार्थ्यांनी ही उपकरणे स्वत: हाताळावीत तसेच त्यातून त्यांना विज्ञानाबाबत आवड निर्माण व्हावी, हा प्रमुख हेतू आहे. याचबरोबर मुलांच्या सुरक्षिततेचीही पूर्ण काळजी घेतली जाणार आहे. शिक्षक व इतर विज्ञानप्रेमींनाही यात पूर्व परवानगी घेऊन प्रयोग करता येणार आहेत, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
ही प्रयोगशाळा अतिशय वेगळ्या प्रकारची असल्याने सुरूवातीला या शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी २५ सत्र घेण्यात येणार आहेत. या प्रयोगशाळेचे उद्घाटन २५ रोजी सकाळी ११ वाजता फिनोलेक्स अॅकॅडमी आॅफ मॅनेजमेंट अॅण्ड टेक्नॉलॉजीचे प्राचार्य डॉ. कौशल प्रसाद यांच्या उपस्थितीत होणार आहे.यासाठी स्थानिक स्तरावर समिती स्थापन करण्यात आली आहे. यात इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल, इंजिनिअरिंग, प्रोटोटाईप आदी क्षेत्रात सेवावृत्तीने योगदान देऊ इच्छिणाऱ्या मंडळींचा समावेश आहे. यात मुख्याध्यापक, प्रयोगशाळेचे प्रमुख यांच्यासह विज्ञान शिक्षकांसह इतर शिक्षक यांचे योगदान असणार आहे. निवडक विद्यार्थ्यांसाठी २३ व २४ डिसेंबर रोजी उद्घाटनपूर्व प्रशिक्षण होणार असून, या कार्यशाळेत तयार केलेल्या काही साधनांचे प्रदर्शन २५ रोजीच्या उद्घाटन समारंभादरम्यान होणार आहे.