रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोनाची वाढ झपाट्याने वाढत असली, तरी रत्नागिरी तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट बनला आहे. दररोज या तालुक्यात १०० पेक्षा जास्त कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे रत्नागिरी तालुक्यात कोरोनाची सर्वात जास्त संख्या असून, भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
खोदाईची कामे कधी थांबणार
रत्नागिरी : पावसाळा तोंडावर आला असला, तरी रत्नागिरी शहर परिसरातील रस्त्यांची खोदाईची कामे सुरू आहेत. शहर परिसरामध्ये वेगवेगळ्या कामांसाठी खोदाई करून साइडपट्ट्यांचे डांबरीकरण करण्यात आले होते. त्यानंतर, पुन्हा या साइडपट्ट्यांची खोदाई सुरू झाल्याने रहिवासी हैराण झाले आहेत.
मासेमारी व्यवसाय तोट्यात
रत्नागिरी : कोरोनाचा प्रादुर्भाव अजूनही कमी झालेला नाही. वातावरणातील सततच्या बदलामुळे मासेमारी अनेकदा बंद ठेवावी लागली होती. त्यामुळे मच्छीमारांना मोठा आर्थिक फटका बसला होता. त्यातच कोरोनाचे रुग्ण वाढल्याने त्याचा परिणाम मासेमारीवर झाला आहे. त्यामुळे मच्छीमार तोट्यात असून, आर्थिक अडचणीत सापडला आहे.
पाणीटंचाईने लोक हैराण
देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील पाण्याची पातळी खालावली आहे. त्यामुळे दिवसेंदिवस टंचाईग्रस्तांच्या संख्येत वाढ होत असल्याने लोकांची वणवण भटकंती सुरू झाली आहे. ५ गावांतील ७ वाड्यांमध्ये पाणीटंचाई सुरू असून, २ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे, तोही अपुरा पडत आहे.
मजुरांचे हाल
रत्नागिरी : कोरोनाचा सर्वच व्यवसायांवर परिणाम झाला असला, तरी हातावर पोट असलेल्या मोलमजुरी करणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. काेरोनाच्या पहिल्या टप्प्यामध्ये दानशूरांनी मोठ्या प्रमाणात गरीब, मजुरांना अन्नधान्याची मदत केली होती. मात्र, दुसऱ्या टप्प्यात कोरोनाचे प्रमाण वाढले असले, तरी मदत करणाऱ्यांनी हात अखडते घेतले आहेत.
काजू बी व्यवसाय ठप्प
रत्नागिरी : जिल्ह्यात काजू बीच्या व्यवसायातून माेठ्या प्रमाणात लाखो रुपयांची उलाढाल होते. मात्र, हा व्यवसाय सिझननुसार असल्याने एप्रिल, मे महिन्यात मोठ्या प्रमाणात चालतो. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांत या व्यवसायाला ग्रहण लागले आहे. त्यामुळे काजू बी व्यावसायिक अडचणीत आले आहेत.
लसीकरण केंद्रांवर गर्दी
रत्नागिरी : कोरोनाचा संसर्ग वाढत चालला असला, तरी लसी मिळण्याचे प्रमाण फार कमी आहे. शासनाकडून जसा लसींचा पुरवठा करण्यात येतो, त्याप्रमाणे लसीकरण सुरू करण्यात येते. लसीकरणाचे महत्त्व लोकांना समजू लागल्याने, लसीकरण केंद्रांवर लोकांची गर्दी वाढू लागली आहे.
हातगाडीवाल्यांचा व्यवसाय तेजीत
रत्नागिरी : सध्या रमजान महिना सुरू आहे. या महिन्यामध्ये फळांचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो. कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू असतानाही हातगाडीवाले फळ विक्रेते फिरताना दिसतात. अनेकांच्या मास्कही नसतात. त्यामुळे या हातगाडीवाल्यांना कोण रोखणार, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.