कोरोना चाचण्यांमध्ये वाढ, ३८१ रुग्ण सापडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:23 AM2021-07-18T04:23:18+5:302021-07-18T04:23:18+5:30
रत्नागिरी : जिल्ह्यात चाचण्या वाढविण्यात आल्याने कोरोनाबाधितांमध्ये वाढ झाली आहे. शनिवारी बाधित ३८१ रुग्ण सापडले असून, ...
रत्नागिरी : जिल्ह्यात चाचण्या वाढविण्यात आल्याने कोरोनाबाधितांमध्ये वाढ झाली आहे. शनिवारी बाधित ३८१ रुग्ण सापडले असून, एकूण रुग्णसंख्या ६८,३२३ इतकी झाली आहे. दिवसभरात ३०४ रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ६२,७०२ झाली आहे. जिल्ह्यात कोरोनाने तिघांचा मृत्यू झाला असून, आतापर्यंत एकूण १,९४१ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या ॲक्टिव्ह रुग्ण ३,२५२ असून, जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर ७.५५ टक्के आहे.
जिल्ह्यात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले असले तरी दिवसभरात एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. ज्या तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे, ते मागील दिवसातील आहेत. हे तिन्ही रुग्ण महिला असून, त्या ४७ वर्षे, ७२ वर्षे आणि ८५ वर्षे वयाच्या आहेत. त्यामध्ये रत्नागिरी, चिपळूण आणि लांजा तालुक्यातील प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. बाधितांच्या मृत्यूचा दर २.८५ टक्के असून, रुग्ण बरे होण्याचा दर ९१.७७ टक्के आहे.
जिल्ह्यात कोरोना चाचण्यांमध्ये पुन्हा वाढ करण्यात आल्याने बाधितांची संख्या वाढली आहे. ५,०४६ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यामध्ये मंडणगड तालुक्यात ४ रुग्ण, दापोलीत ३७, खेडमध्ये ५७, गुहागरात २५, चिपळुणात ८१, संगमेश्वरात ४१, रत्नागिरीत ९३, लांजात १२ आणि राजापुरात ३१ रुग्ण सापडले.