आरवली : संगमेश्वर तालुक्यातील कडवई पंचक्रोशीतून चिपळूण येथील पूरग्रस्तांना मदतीचा ओघ वाढत आहे. पंचक्रोशीतील अनेक संस्था, मंडळे, सर्वच समाजातील नागरिक, राजकीय पक्षांचे कार्यकर्ते हे पुराच्या पहिल्या दिवसापासून आजतागायत चिपळूणवासीयांना जमेल त्या पद्धतीने यथाशक्ती मदत करण्याचा प्रयत्न करत आहेत.
चिपळूणला आलेल्या महाभयंकर प्रलयानंतर कडवई पंचक्रोशी चिपळूणकडे धावली. रिक्षा संघटनेचे अध्यक्ष मिलिंद चव्हाण, सचिव राजेश रेडीज, खजिनदार रुपेश रहाटे, सदस्य राजेंद्र भोजने, उदय चव्हाण, बंड्या मयेकर, कडवईचे माजी सरपंच बापू कदम, गोळवली उपसरपंच यांनी पहिल्या दिवशी पूरग्रस्त भागात जाऊन जेवण, पाणी व बिस्किटांचे वाटप केले. दुसऱ्या दिवशी टँकरने पिण्याचे पाणी वाटण्यात आले. तर तिसऱ्या दिवशी धान्य, कपडे, टीसीएल पावडर व भांड्यांचे वाटप केले. यासाठी मंगेश शेलार, योगेश रेडीज, जनार्दन पास्ते, तौसिफ डिंगणकर, पप्पू जाधव, ग्रामपंचायत कडवई, ग्रामपंचायत तुरळ यांचे सहकार्य लाभले.
वरदान क्रीडा मंडळातर्फे चिपळुणात तीन दिवस अन्नाची पॅकेट तसेच पाणी, बिस्कीट, कपडे यांचे वाटप करण्यात आले. सकल मराठा समाज, संगमेश्वरतर्फे पूरग्रस्त भागात अन्नधान्य, बिस्कीट व इतर साहित्य वाटण्यात आले. यासाठी रवींद्र सुर्वे, ऐश्वर्या घोसाळकर, उदय तळेकर, गणेश ब्रीद, प्रतीक शिंदे, संदीप सुर्वे, मनिष सावंत, पप्पू जाधव, सुभाष घोसाळकर यांचे सहकार्य लाभले.
मनसेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण व संपर्क अध्यक्ष श्रीपत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तुरळ - चोबारवाडी, कडवई - धामनाकवाडी व परिसरातील मनसैनिकांनी तसचे कडवई - कुवळेकरवाडी येथील ग्रामस्थांनी राजमंडप डेकोरेटर्सच्या सहकार्याने साफसफाईचे काम केले. कडवई येथील मुस्लिम समाजातर्फे पूरग्रस्त भागात पाणी, बिस्कीट, अन्नधान्य, कपडे, सॅनिटरी नॅपकीन अशा विविध उपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले.
तुरळ, शेनवडे, चिखली, तांबेडी, मासरंग, रांगव ग्रामस्थांतर्फे अन्नधान्य, पाणी व इतर वस्तूंचे वाटप करण्यात आले. आयडियल ग्रुपनेही अन्नधान्य, पाणी, बिस्कीट यांचे वाटप केले.