देवरूखनजीक टेम्पो उलटून अपघात, ९ जण जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2019 04:14 PM2019-01-16T16:14:25+5:302019-01-16T16:17:01+5:30
नजीकच्या पूर येथील एका वळणावर टेम्पो उलटून झालेल्या अपघातात ९ जण जखमी झाले आहेत. जखमीपैकी ४ जणांची प्रकृती गंभीर आहे. या सर्वांवर देवरुख ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अपघातग्रस्त टेम्पोचा चालक मात्र फरार झाला आहे. हा अपघात सोमवारी सायं. ७.१५ वाजताच्या सुमारास घडला. जखमीपैकी ६ जण मार्लेश्वर यात्रेला निघाले होते.
देवरूख : नजीकच्या पूर येथील एका वळणावर टेम्पो उलटून झालेल्या अपघातात ९ जण जखमी झाले आहेत. जखमीपैकी ४ जणांची प्रकृती गंभीर आहे. या सर्वांवर देवरुख ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अपघातग्रस्त टेम्पोचा चालक मात्र फरार झाला आहे. हा अपघात सोमवारी सायं. ७.१५ वाजताच्या सुमारास घडला. जखमीपैकी ६ जण मार्लेश्वर यात्रेला निघाले होते.
या अपघातात पूर्वा संदीप रहाटे (३२), साहेम संदीप रहाटे (८), संदीप जयराम रहाटे (३६), सुनिता सुनिल सावर्डेकर (६०), सुरेश बावू सावर्डेकर (६५), संदीप बळीराम गिम्हवणेकर (५५), समर्थ संदीप सावर्डेकर (८), मानवी संदीप गिम्हवणेकर (३५), हरिश्चंद्र्र प्रभाकर कदम (३८) हे जखमी झाले आहेत.
ही घटना सोमवारी सायंकाळी ७. १५ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेनंतर टेम्पो चालक फरार झाल्याने संताप व्यक्त होत आहे. निवळी फाटा येथे हे जखमी टेम्पोत बसले. त्यानंतर ते टेम्पोतून देवरुख येथे येत असताना पूर येथील एका वळणावर टेम्पो उलटून अपघात झाला.
या अपघातातील रहाटे हे नांदवज रहिवासी आहेत तर बाकीचे जखमी हे मुंबईतील रहिवासी आहेत. यापैकी रहाटे कुटुंब हे गणपतीपुळे येथून आपल्या नांदळज गावी येत होते तर गिम्हवणे व कदम हे मार्लेश्वर यात्रेला निघाले होते.
या जखमींना पूर येथील भाऊ डोंगरे व ग्रामस्थांनी देवरुख ग्रमीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र ही घटना घडताच टेम्पो चालक फरार झाल्याने जखमींनी व पूर येथील ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. सायंकाळी उशीरा या घटनेची नोंद देवरुख पोलीस ठाण्यात करण्यात आली. जखमीपैकी चारजण गंभीर जखमी असून त्यांना रत्नागिरी येथे हलविण्यात आले आहे.