लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : नजिकच्या शिरगाव येथील मत्स्य महाविद्यालयातील प्राध्यापक आणि मत्स्य अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख डॉ. बी. आर. चव्हाण यांच्या १ कोटी ७८ लाख ९१ लाख ४३८ रूपयांच्या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धात्मक संशोधन प्रकल्पाला मंजुरी मिळाली आहे. महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठातील हा पहिलाच प्रकल्प आहे. यासंदर्भात डॉ. बी. आर. चव्हाण यांच्याशी ‘लोकमत’ने साधलेला संवाद.
प्रश्न : या प्रकल्पामागचा प्रमुख उद्देश कोणता?
उत्तर : कोकण विभागातील अनुसूचित जाती समूहातील लोकांना स्वयंरोजगार मिळून देण्याबरोबरच त्यांचा आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक विकास व्हावा, हा या प्रकल्पामागचा प्रमुख उद्देश आहे. त्यादृष्ष्टीने तीन वर्षांकरिता हा प्रकल्प राबविला जाणार आहे.
प्रश्न : या प्रकल्पाची प्रमुख वैशिष्ट्ये कोणती?
उत्तर : दुर्लक्षित जलस्रोत/जलाशयात जर शास्त्रीय पद्धतीने मत्स्यसंवर्धन केले तर नक्कीच मत्स्योत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ होऊन ग्रामीण युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. यादृष्टीने प्रकल्पांतर्गत जलाशयामध्ये पिंजऱ्यात मत्स्य संवर्धन तंत्रज्ञान आणि बायोफ्लॉक तंत्रज्ञान वापरून शास्त्रीय पद्धतीने मत्स्यसंवर्धन करण्यात येणार आहे. यासाठी वापरण्यात येणाऱ्या नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानामुळेच राष्ट्रपती यांच्या मान्यतेने हा प्रकल्प भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाकडून मंजूर झाला आहे.
प्रश्न : हा प्रकल्प कसा राबविला जाणार?
उत्तर : रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड अशा तीन जिल्ह्यांमध्ये एकूण ४० लाभार्थी निश्चित करण्यात आले आहेत. त्यांनी जागा आणि पाणी उपलब्ध करून द्यायचे आहे. त्यांच्या जागेवर प्रकल्प उभारले जाणार असून, या प्रकल्पाचा खर्च शासनाच्या या निधीतून हाेणार आहे. त्यातून मिळणारे उत्पन्न लाभार्थ्यांना दिले जाणार आहे.
प्रश्न : प्रकल्पारंभ कधी होणार?
उत्तर : सध्या प्राथमिक तयारी सुरू आहे. सर्व ठिकाणी प्रकल्पांची जागा, पाणी आदी बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर पाहत आहे. यासाठी लोकांची मेहनत महत्त्वाची असून, प्रकल्प नक्की यशस्वी हाेईल.
कोकणातील तीन जिल्ह्यांत राबविणार
हा प्रकल्प रत्नागिरी, सिंधुुदुर्ग आणि रायगड या तीन जिल्ह्यांत राबविला जाणार आहे. पिंजऱ्यातील मत्स्यसंवर्धन लांजा तालुक्यातील झापडे येथील धरणावर राबविण्यात येणार आहे. तर बायोफ्लाॅक तंत्रज्ञान वापरून पाली (ता. रत्नागिरी) आणि गवाणे (ता. लांजा), सिंधुदुर्गमध्ये मालवण तालुक्यातील पेंडूर आणि कांदळगाव तर रायगड जिल्ह्यात मुठावली (ता. रोहा) येथे राबविला जाणार आहे.
कोकण कृषी विद्यापीठाचे मार्गदर्शन
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय सावंत, संशोधन संचालक डॉ. पराग हळदणकर, विस्तार शिक्षण संचालक डॉ. संजय भावे, शिक्षण संचालक डॉ. सतीश नारखेडे तसेच मत्स्य विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. प्रकाश शिंगारे आणि विभागप्रमुख सुरेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकल्प प्रमुख म्हणून डॉ. बी. आर. चव्हाण हे काम पाहणार आहेत. डाॅ. राहुल सदावर्ते, डाॅ. हरिष धमगाये, डाॅ. हणमंते, डाॅ. संदीप पाटील हे प्रकल्प उपप्रमुख आहेत.