चिपळूण : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे खबरदारीचा उपाय म्हणून गाणे खडपोली येथील जे. के. फाईल्स कंपनीतील कामगारांनी आठ दिवस कामावर न जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार दोन दिवस कामगार कंपनीत गेलेच नाहीत. त्यामुळे आक्रमक झालेल्या कंपनी व्यवस्थापनाने कामगारांना नोटीस बजावली आहे.
व्यवस्थापनाकडून कामगारांची योग्य ती काळजी घेतली जात आहे. अघोषित संप पुकारून कामावर येणे बंद करू नये. कामगारांनी कामावर हजर राहावे, अन्यथा कारवाईला सामोरे जावे, असा इशारा कंपनी व्यवस्थापनाकडून देण्यात आला आहे.
गाणे खडपोली येथील जे. के. फाईल्स कंपनीतील कामगारांनी शुक्रवारी सकाळी पहिल्या पाळीतील सर्व कामगार व कर्मचाऱ्यांनी कामावर येऊन बैठक घेतली. त्यानंतर ८ दिवस काम बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यापाठोपाठ रात्रपाळीतील कामगारांनीही काम बंद ठेवले. त्यानुसार कंपनी व्यवस्थापनाने बजावलेल्या नोटिसीमध्ये म्हटले आहे की, शुक्रवारी सकाळी ७.४० वाजता कामावरून निघून जात कामगारांनी बेकायदेशीर संप सुरू केला. कोरोना ही महामारी आहे. उद्योजकांना कामकाज सुरू ठेवण्यास शासनाची मान्यता आहे. आपल्या औद्योगिक क्षेत्रातील इतर उद्योगही नियमितपणे सुरू आहेत. कोरोनाबाबत सर्व प्रतिबंधक उपाय व्यवस्थापन घेत आहे व घेणार आहे. सर्व कामगार व कर्मचाऱ्यांना या घटनेची माहिती आहे. काही कर्मचाऱ्यांच्या चिथावणीमुळे व अपप्रचारामुळे कर्मचाऱ्यांची अनधिकृतपणे सभा घेऊन कामकाज पूर्णपणे बंद ठेवले. सर्व कामगारांनी अघोषित संप सुरू केल्याची स्थिती आहे. कोरोनाच्या अडचणीच्या परिस्थितीत कर्मचाऱ्यांकडून सहकार्याची अपेक्षा आहे. त्यामुळे संप न करता सर्व कामगारांनी कामावर हजर राहावे, असे आवाहन कंपनी व्यवस्थापनाने केले आहे. कामावर हजर न झाल्यास कारवाईचा बडगा उगारण्याचा इशारा कंपनी व्यवस्थापनाने दिला आहे.