जलसमाधी होता होता टळली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:32 AM2021-07-28T04:32:58+5:302021-07-28T04:32:58+5:30
संदीप बांद्रे चिपळूण : महापुराचा रुद्र अवतार ट्रकच्या केबिनमधून तब्बल २२ तास अनुभवला. प्रत्येक क्षणाला जलसमाधीची जाणीव होत होती ...
संदीप बांद्रे
चिपळूण : महापुराचा रुद्र अवतार ट्रकच्या केबिनमधून तब्बल २२ तास अनुभवला. प्रत्येक क्षणाला जलसमाधीची जाणीव होत होती आणि मदत मिळण्याची शक्यता नव्हती. त्यामुळे जलसमाधी होता होता टळली, असेच म्हणावे लागेल. मात्र, या जलप्रवाहात १५ वर्षे राबून उभा केलेला आपला मोटार ड्रायव्हिंग स्कूलचा व्यवसाय जलमय झाला, असे व्यावसायिक महेश पंडित यांनी सांगितले.
याविषयी पंडित म्हणाले, आपल्या मित्राने सकाळी सहाला कावीळतळी येथील कार्यालयाच्या बाहेर पाणी आल्याचे सांगितले. तसा क्षणाचा विलंब न लावता ऑफिसकडे जाण्यास निघालो. अभिरुची हॉटेलसमोर गाडी उभी करून मधल्या गल्लीतून चालत जाऊन कावीळतळीच्या रोडवर आलो. तेथे गुडघाभर पाणी होते. पाठीमागून तुषार गोखले यांची बस त्यांचे ड्रायवर कदम घेऊन आले. आता वाटले की ऑाफिसपर्यंत जाऊ शकतो, कारण ऑफिस नजरेसमोर होते. लगेच कसाबसा बसमध्ये चढलो आणि तिथे वळण घेताना बस पाण्यात बंद पडली.
तेथूनच आमचा खडतर प्रवास सुरू झाला. आम्ही दोघे बसमध्ये होतो. बाजूला मैदानात तीन ट्रक होते. त्यापैकी एक पेपरने भरलेला होता. ट्रक व बसमध्ये अंतर साधारण ३० फूट होते. काही कळायच्या आत बसमध्ये आमच्या छातीभर पाणी आले. ट्रकच्या मुलांनी आम्हाला दोरी टाकली. कसेतरी पोहत आम्ही दोघेही ट्रकमध्ये गेलो. रिकाम्या ट्रकच्या हौद्यात त्या वेळी दोन फूट पाणी होते.
मी उत्तम पोहणारा असूनही पाण्यात उडी मारावी, असे धाडस होत नव्हते. पाण्याचा वेग एवढा होता की खेर्डीतून गाड्या, टपऱ्या वाहत येत होत्या. दुपारी तीन वाजले, भूक तर लागलेली पण पोटात भीती. आमच्या जवळ एक कसला तरी बॉक्स वाहत येताना दिसला. आमच्यातील एकाने तो पकडला. तो कसला आहे हे बघितले तर तो कॅडबरीचा बॉक्स होता. त्यात बरोबर ५ कॅडबरी होत्या. याच दरम्यान सायंकाळी ५ वाजता थोडे पाणी ओसरले. आम्ही खाली उतरायचा प्रयत्न केला; पण परत १० मिनिटांत पाणी वाढले. सायंकाळी ६ नंतर पाऊस पुन्हा वाढला आणि रात्री १२.३०पर्यंत पाऊस असा काही भयंकर पडला की रात्री बारानंतर पाणी जोराने आले आणि आम्ही ट्रकच्या केबिनवर बसून आमचा मृत्यू पाहिला. ट्रकची ड्रायव्हर केबिन अर्धी बुडाली, पण थाेड्या वेळाने पाऊस थांबला. नाहीतर आमची जलसमाधी नक्की होती. सकाळी ७ ते दुसऱ्या दिवशी ५ वाजता म्हणजे २२ तास आम्ही थरार अनुभवला.
----------------------
होतं नव्हतं सगळं गेलं!
पंधरा वर्षांच्या अथक परिश्रमातून उभ्या केलेल्या ट्रेनिंग स्कूलच्या तीन गाड्या, ३० संगणक, दोन प्रोजेक्टर सगळे होत्याचे नव्हते झाले. काही शिल्लक नाही. काय करावे सुचत नाही. मात्र जीव वाचला हेच महत्त्वाचं. तुरंबवची आई शारदा देवीनेच आपल्याला वाचविले.