‘जून’चे टार्गेट पूर्ण, मात्र जुलैमध्ये प्रतीक्षाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:21 AM2021-07-11T04:21:54+5:302021-07-11T04:21:54+5:30
गेल्या काही वर्षांपासून पावसाचे वेळापत्रक अनियमित झाले आहे. पूर्वी जून आणि जुलै हे दोन महिने पावसाचे मानले जात असत. ...
गेल्या काही वर्षांपासून पावसाचे वेळापत्रक अनियमित झाले आहे. पूर्वी जून आणि जुलै हे दोन महिने पावसाचे मानले जात असत. कोकणात जून ते सप्टेंबर हे चार महिने पावसाचे गणले जातात. मात्र, गेल्या दोन - तीन वर्षांपासून जून आणि जुलै महिन्यात पावसाचा फारसा प्रभाव दिसत नाही. गेल्या दोन वर्षांत तर जुलै महिन्याने निराशा केलेली दिसते आणि ऑगस्ट महिन्यात जोरदार पाऊस झाला आहे. २०२० साली पाऊस कमीच होता. मात्र, वर्षभर वादळे होत राहिल्याने अगदी डिसेंबरपर्यंत पावसाचा मुक्काम होता.
यंदाही पावसाने जून महिन्याची ८१८ मिलिमीटरची सरासरी पूर्ण केली असली तरी शेवटच्या आठवड्यापासून मात्र प्रमाण कमी झाले आहे. मध्यंतरीच्या काळात पाऊस जोरदार हजेरी लावत होता. मात्र, दिवसभर ऊन असल्याने शेतीचा खोळंबा होत गेला. आताही गुरूवारपासून पावसाला सुरूवात झाली आहे. मात्र, अजूनही म्हणावा तशी मान्सूनच्या पावसाला सुरूवात झालेली दिसत नाही.
पावसाचे प्रमाण कमीच
कोकणात जून ते सप्टेंबर हे चार महिने पावसाचे गणले जातात. जून महिन्यात साधारणपणे ८१८ मिलिमीटर पाऊस पडतो. यावर्षी या महिन्यात साधारणत: ९१० मिलिमीटर पाऊस झाला आहे. त्यामुळे यावर्षी पावसाने जूनचा कोटा पूर्ण केला. मात्र, महिन्याच्या शेवटी पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. गुरूवारपासून जोरदार पाऊस पडेल, असे वाटत होते. परंतु, अजूनही जोर कमी आहे.
जुलै महिना पावसाचा...
पावसाच्या चार महिने कालावधीतील जुलै महिना हा सर्वाधिक पावसाचा मानला जातो. या महिन्यात रत्नागिरी जिल्ह्यात साधारणपणे १२८६ मिलिमीटर पाऊस पडतो. यंदा जुलै महिन्याचे पंधरा दिवस सरत आले आहेत. मात्र, पाऊस कमीच असल्याने जुलैची सरासरी पूर्ण करणार का, अशी शंका वाटू लागली आहे.