- मनसेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन
लाेकमत न्यूज नेटवर्क
आरवली : संगमेश्वर तालुक्यातील कडवई येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात गेली दोन वर्षे डॉक्टर व इतर कर्मचारीच नसल्याने हा दवाखाना बंदच आहे. त्यामुळे परिसरातील पशुधन धोक्यात आले आहे. मात्र, असे असले तरी येथे कर्मचारी निवास बांधण्यासाठी जिल्हा परिषदेकडून लाखो रुपयांची तरतूद करून याचे बांधकाम पूर्ण करण्यात तत्परता दाखवण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
दोन वर्षे डॉक्टर व इतर कर्मचारी नसल्याने दवाखाना दोन वर्षे बंद असताना, त्याची तरतूद करण्याचे सोडून बांधकामावर लाखो रुपयांची उधळपट्टी करणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या कार्यतत्परतेबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. याबाबत मनसेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनात जिल्ह्याचा पशुसंवर्धन विभाग अकार्यक्षम होत असल्याचे म्हटले आहे; तर या विभागात कमी असणाऱ्या मनुष्यबळाची तरतूद करण्याऐवजी मलिदा लाटण्यासाठी फक्त टोलेजंग इमारती बांधल्या जात आहेत, असा आरोपही निवेदनातून करण्यात आला आहे.
इथे कर्मचारीच नसल्याने येथील शेतकऱ्यांच्या जनावरांवर वेळीच उपचार होत नसल्याने येथील पशुधन धोक्यात आले आहे. या भागातील एक शेतकरी निजाम पांगारकर यांनी बंदिस्त शेळीपालनाचा व्यवसाय सुरू केला. त्यांची एक शेळी प्रसूतीदरम्यान आजारी पडली़; मात्र इथे डॉक्टर नसल्याने तिचा उपचाराअभावी मृत्यू झाल्याने या शेतकऱ्याला मोठे नुकसान सोसावे लागले. अशा अनेक घटना या भागात मागील दोन वर्षांत घडल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे, असेही या निवेदनात म्हटले आहे. लोकप्रतिनिधींच्या तुंबड्या भरण्यासाठी टोलेजंग इमारती बांधण्यापेक्षा कडवईसह जिल्ह्यातील सर्व पशुवैद्यकीय दवाखान्यातील रिक्त पदे तत्काळ भरण्यात यावीत, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
------------------------------
संगमेश्वर तालुक्यातील कडवई पशुवैद्यकीय दवाखान्याची इमारत बंद आहे, तर बाजूलाच कर्मचाऱ्यांसाठी नवीन इमारतीचे काम जाेरात सुरू आहे.