कोमसाप युवा शक्तीचे तरंगते कवी संमेलन
By admin | Published: November 16, 2014 10:02 PM2014-11-16T22:02:45+5:302014-11-16T23:33:28+5:30
दापोलीनजीकच्या दाभोळ खाडीत १४ डिसेंबरपासून आयोजन
रत्नागिरी : कोकण मराठी साहित्य परिषद युवा शक्तीतर्फे येत्या १४ डिसेंबर रोजी प्रथमच दापोली तालुक्यातील दाभोळ खाडी येथे तरंगते युवा काव्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. ही माहिती परिषदेचे अध्यक्ष डॉ. महेश केळुसकर, कार्याध्यक्ष नमिता कीर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी कोषाध्यक्ष प्रकाश दळवी, रत्नागिरीच्या युवा शक्तीप्रमुख गौरी सावंत व पदाधिकारी उपस्थित होते. या संमेलनाबाबत माहिती देताना केळुसकर व कीर यांनी सांगितले की, कोकण मराठी साहित्य परिषद गेली २५ वर्षे कोकण प्रांतात विविध स्तरावर मराठी साहित्य विषयात कार्यरत आहे. पुढील वर्ष हे परिषदेचे रौप्यमहोत्सवी वर्ष असून त्यानिमित्ताने वर्षभर विविध साहित्यिक कार्यक्रम सादर केले जाणार आहेत. दाभोळ खाडीत होणारे हे युवा शक्तीचे तरंगते कवीसंमेलन रौप्यमहोत्सवी वर्षाच्या पूर्वसंध्येला आयोजित होत आहे. त्यामध्ये कोकण प्रांताच्या पालघर, ठाणे, मुंबई, नवी मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातून युवा शक्ती अंतर्गत असलेल्या महाविद्यालय युवा कट्टाच्या माध्यमातून निवडक नवोदित कवी बहुसंख्येने उपस्थित रहाणार आहेत.
या संमेलनासाठी १३ डिसेंबर १४ रोजी सर्व जिल्ह्यामधून युवा कट्ट्यामार्फत स्वरचित काव्य वाचन स्पर्धेद्वारे निवडलेले दोन कवी दापोली येथे एकत्र येतील. तेथील एका मंगल कार्यालयात त्यांचा निवास असेल. १४ डिसेंबर १४ रोजी सकाळी ९ ते १० या वेळेत इको फ्रेंडली परांजपे संग्रहालयाला भेट व नवरत्नांना मानवंदना, १० वाजता चिखलगावकडे प्रयाण, ११ ते १ कवीता कार्यशाळा संचलन डॉ. महेश केळुसकर व गौरी कुलकर्णी, २.३० ते ३.३० साहित्यिकांजवळ खुली चर्चा व प्रश्नोत्तर, ४ ते ५ लोकमान्य टिळकांच्या मुळ निवासस्थानाला भेट, ६ वाजता सुर्यास्तासमवेत दाभोळ खाडी येथे बोटीवर तरंगत्या कवी संमेलनाला सुरुवात. या तरंगत्या कवी संमेलनास कोमसापचे अध्यक्ष डॉ. केळुसकर, गौरी कुलकर्णी, रवींद्र आवटी, डॉ. सलील कुलकर्णी, संदीप खरे, सौमित्र अशा दिग्गज कवींची उपस्थिती लाभणार आहे. तर खुल्या चर्चेकरिता डॉ. सागर देशपांडे उपस्थित राहणार आहेत.(प्रतिनिधी)