जाकादेवी : रत्नागिरी तालुक्यातील खालगाव - जाकादेवी परिसरामध्ये कोरोना संसर्ग अधिक प्रमाणात वाढल्यामुळे खालगाव परिसराला कन्टेन्मेंट झोन म्हणून जाहीर केला आहे. खालगाव ग्रामपंचायत व प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या माध्यमातून पाच पथकांच्या साहाय्याने जाकादेवी परिसरातील नागरिकांची सरसकट कोरोना चाचणी करण्यात येत आहे. एका दिवसात ६९१ जणांची चाचणी करण्यात आली असून, ३ जण पाॅझिटिव्ह आढळले.
खालगाव कन्टेन्मेंट झोनमुळे बाजारपेठेतील सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णयही झाला आहे. रुग्णांची संख्या वाढत असल्याने जाकादेवी, खालगाव परिसरात अलगीकरण केंद्र लवकरात लवकर सुरू करण्याच्या सूचना गटविकास अधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार यांनी खालगाव ग्रामपंचायतीला केल्या आहेत. खालगाव भागामध्ये १०६ पैकी ३ लोकांचा मृत्यू झाला असून १०३ रुग्ण ॲक्टिव्ह आहेत.
जाकादेवी, खालगाव, जाकादेवी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात खालगाव, तरवळ, बोंड्ये, देऊड, लाजुळ, करबुडे इत्यादी सहा उपकेंद्रे आहेत. जाकादेवी आरोग्य केंद्रांतर्गत २६ हजार १८५ एवढी या भागात लोकसंख्या असून या लोकसंख्येपैकी सुमारे चार हजार नागरिकांना कोरोना लसीच्या मात्रा देण्यात आल्या आहेत. कन्टेन्मेंट झाेन जाहीर करताच खालगाव - जाकादेवी परिसरात घराेघरी जाऊन चाचण्या करण्यात येत आहेत. एका दिवशी ६९१ जणांची चाचणी करण्यात आली. त्यामध्ये ३ जण पाॅझिटिव्ह आढळले असून, त्यांना उपचारासाठी पाठविण्यात आले आहे.
--------------------------
जाकादेवी-खालगाव परिसरात घरोघरी कोरोना चाचणी करण्यात येत आहे. (छाया : संतोष पवार)