लाेकमत न्यूज नेटवर्क
लांजा : पर्यटकांना भुरळ पाडणारे लांजा तालुक्यातील खोरनिनको धरण पूर्ण क्षमतेने भरले असून, अतिवृष्टीमुळे धरणाच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता असल्याने पर्यटक आणि लोकांनी धरणावर जाऊ नये, असे आवाहन लघू पाटबंधारे विभाग साहाय्यक अभियंता श्रेणी-१ वैभव शिंदे यांनी केले आहे. धरण भरल्यामुळे पाण्याचा विसर्ग म्हणजेच मानवनिर्मित धबधबा प्रवाहित झाला आहे.
लांजा तालुक्यातील खोरनिनको येथे मुचकुंदी नदीवर बांधण्यात आलेले नयनरम्य धरण आणि येथील मानवनिर्मित धबधबा हा पर्यटकांना भुरळ पाडणारा असल्याने येथे मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. गेल्या चार ते पाच वर्षांत या खोरनिनको धरण आणि धबधबा या ठिकाणी रत्नागिरी जिल्ह्यासह सिंधुदुर्ग, कोल्हापूर येथील येणाऱ्या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या हे धरण पूर्ण क्षमतेने भरले असून, या धरणात २३.२२ द.ल.घ.मी. इतका पाणीसाठा आहे. धरण भरल्यामुळे कालव्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
सद्य:स्थितीत हवामान खात्याने दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे खोरनिनको गाव आणि मुचकुंदी नदी किनाऱ्यालगतच्या गावांनी सतर्क राहण्याची गरज आहे. याबरोबरच अतिमुसळधार पावसामुळे धरणाच्या आणि मानवनिर्मित धबधब्याच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता असून संभाव्य दुर्घटना घडू नये, या दृष्टीने पर्यटक आणि लोकांनी धरणावर जाऊ नये, असे आवाहन वैभव शिंदे यांनी केले आहे.