रत्नागिरी : समुद्रकिनारा ही जशी कोकणाची ओळख आहे, तसेच एज्युकेशन हब ही कोकणाची ओळख व्हावी, यादृष्टीने आपण काम सुरू केले आहे. त्याचा एक भाग म्हणून नागपूरच्या संस्कृत विद्यापीठाचे तसेच नाशिकच्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे केंद्र येत्या जूनपासून रत्नागिरीत सुरू होत आहे.
सिंधुदुर्गमध्ये आयुर्वेदिक संशोधन केंद्र सुरू होत आहे. २५ कोटी रुपये खर्चून रत्नागिरीतील शासकीय तंत्रनिकेतन अद्ययावत केले जाणार आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली.आपल्या रत्नागिरी दौऱ्याप्रसंगी जिल्हाधिकारी कार्यालयातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्याआधी सकाळपासून त्यांनी विविध खात्यांच्या कामाचा आढावा घेतला.नागपूरच्या रामटेक येथील कवी कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाची चार उपकेंद्रे राज्यात सुरू करण्यावर आधीपासून चर्चा होती. मात्र, त्यात कोणताही निर्णय झाला नव्हता. आता रत्नागिरी, पुणे, औरंगाबाद आणि नांदेड अशा चार ठिकाणी या विश्वविद्यालयाची उपकेंद्रे होणार आहेत. त्यातील रत्नागिरीचे उपकेंद्र येत्या जून महिन्यापासून सुरू होणार आहे.
या उपकेंद्रासाठी बस आगारासमोरील इमारतीमध्ये २० हजार चौरस फूट जागा देण्यात आली आहे, असे ते म्हणाले. या विद्यापीठाचे पहिलेच उपकेंद्र रत्नागिरीत होत असल्याचेही ते आवर्जून म्हणाले.यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची केंद्रे या ना त्या महाविद्यालयाच्या समन्वयाने सुरू आहेत. मात्र, आता त्यांना आयटीआयनजीक दोन एकर जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे. तेथे हे केंद्र होईल. भारतीय प्रशासनिक सेवेचे (आयएएस) स्पर्धा परीक्षा केंद्रही रत्नागिरीत होत असून, मुंबई विद्यापीठाच्या रत्नागिरी उपकेंद्रात हा प्रकल्प राबवला जाणार आहे. या उपकेंद्रातच लोकमान्य टिळक अध्यासन केंद्र होणार असून, त्यासाठी ५० लाखांची तरतूद सरकारने केली आहे.सागरी विद्यापीठाबाबत द्विसदस्यीय समिती अभ्यास करत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आडाळे औद्योगिक वसाहतीत ५० एकर क्षेत्रांवर देशातील पहिले आयुर्वेदिक संशोधन केंद्र सुरू केले जाणार आहे. एकूणच कोकण यातून एज्युकेशन हब होईल, असे ते म्हणाले.काय होणार संस्कृत उपकेंद्रातया उपकेंद्रात संशोधनावर अधिक भर दिला जाईल. बोली भाषांसह प्राचीन भाषांचे संशोधन करणे हा त्यामागचा उद्देश आहे.जगातले पहिले...यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या रत्नागिरीतील उपकेंद्रात छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय ग्रंथालय आणि संशोधन केंद्र उभारले जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलची उपलब्ध असलेली सर्व प्रकारची पुस्तके उपलब्ध करून देणारे हे जगातील पहिले ग्रंथालय असेल, असेही ते म्हणाले.
महाराजांचा अभ्यास करणाऱ्या प्रत्येकाला रत्नागिरीत यावेच लागेल, असे हे केंद्र असेल. त्यासाठी १५ कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, तो मुक्त विद्यापीठ करणार असल्याची माहिती मंत्री सामंत यांनी यावेळी दिली.