राजापूरः गेली दोन वर्षे राजकीय धुळवड उडवून राजापूर तालुक्याला राज्याच्या नकाशावर आणणाऱ्या नाणार येथील सात महसूली गावांतील चौदा वाड्यांना अखेर रत्नागिरी रिफायनरी प्रकल्प कंपनीने बाय - बाय केले आहे. यामुळे शिवसेनेच्या दृष्टीने नाणार विषय संपलेला असतानाच आता रत्नागिरी रिफायनरी कंपनीनेही नाणारमधील जागेचा विषय संपुष्टात आणला आहे. दरम्यान तालुक्यातील बारसू - सोलगांव येथील जागेसाठी रिफायनरी कंपनीचे अखेरचे प्रयत्न सुरू असून यात देखील अपयश आल्यास कंपनी महाराष्ट्राच्या बाहेर प्रकल्प नेण्याचे जवळपास निश्चित झाले आहे.
नाणारमधील पूर्वी प्रस्तावित असलेल्या चौदा गावांतील तब्बल साडेआठ हजार एकराचे जमीनमालक असलेल्या शेतकरी व भूधारकांनी त्या भागात रिफायनरी व्हावी यासाठी जोरदार प्रयत्न करून शासनापर्यंत लेखी संमतीपत्रे पोहोचवली होती. मात्र उध्दव ठाकरे यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख असताना जाहिर केलेली नाणार विरोधाची भूमिका राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतरही कायम ठेवल्याने अखेर रत्नागिरी रिफायनरी कंपनीने या जागेतून काढता पाय घेतला आहे. यामुळे नाणार होणार नाही हा शिवसेनेचा मनसुबा खरा ठरून शिवसेनेच्या नेतेमंडळींनी बाजी मारली आहे.
दरम्यान नाणारनंतर राजापूर तालुक्यातीलच शहरानजिकच्या बारसू - व सोलगांव याठिकाणच्या जागेत रिफायनरी कंपनीने आपला मोर्चा वळवला आहे. याठिकाणी शिवसेनेच्याच उद्योगमंत्र्यांनी एमआयडीसी अंतर्गत बारसू , सोलगांव , वरचीवाडी याठिकाणी २३०० एकरासाठी अधिसूचना काढलेली आहे. तर धोपेश्वर ग्रामपंचायत हद्दीतील बारसू , पन्हळे , गोवळ ग्रामपंचायत हद्दीतील गोवळ , वरचीवाडी व खालचीवाडी, ग्रामपंचायत सोलगांव ग्रामपंचायत शिवणेखुर्द व देवाचेगोठणे ग्रामपंचायत हद्दीतील देवाचेगोठणे, बुरंबेवाडी, राऊतवाडी व सोगमवाडी आदि भाग मिळून सुमारे ११ हजार पाचशे एकर जमीनीची उपलब्धता आहे.
याठिकाणी धोपेश्वर गावची जमीन प्रस्तावित नाही. शिवाय विशेष म्हणजे तब्बल या साडेअकरा हजार एकरात एकाही गाव अथवा वाडीचे विस्थापन नसल्याने रिफायनरी कंपनीसाठी ही बाब लाभदायक ठरली आहे. नजिकच्या एक - दोन महिन्यात बारसू - सोलगांव भागात नाग रिकांच्या गाठीभेटी घेऊन प्रकल्पाबाबत माहिती देण्यात येणार आहे. या भागातही बऱ्याच ग्रामपंचायती शिवसेनेच्या ताब्यात असल्याने सेनेची भूमिक महत्वाची ठरणार आहे . मात्र याठिकाणीही नाणारचीच री ओढण्यात आल्यास कंपनी जिल्ह्यातून गाशा गुंडाळणार असल्याचे स्पष्ट संकेत आहेत .