लांजा : तीन ते चार महिने लांजा ग्रामीण रुग्णालयात जबाबदार डॉक्टर नसल्याने रुग्णांची मोठ्या प्रमाणात हेळसांड होत असतानाही लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करत असल्याने जनतेमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. लांजा ग्रामीण रुग्णालय मुंबई - गोवा महामार्गावर आहे. १८ फेब्रुवारी २०१५ रोजी येथे कार्यरत असणारे डॉक्टर येथील त्यांचा कार्यकाळ संपल्याने निघून गेले. त्यानंतर आजपर्यंत येथे डॉक्टर उपलब्ध करण्यात आलेले नाहीत. गेले तीन ते चार महिने डॉक्टर नसल्याने महामार्गावर होणारे अपघात, गुन्हे, इतर रुग्णांना जवळच असणाऱ्या पाली ग्रामीण रुग्णालयात अथवा रत्नागिरी शासकीय रुग्णालयात प्राथमिक उपचार करावा लागतो आणि तक्रार द्यावयाची असेल तर पुन्हा लांजा पोलिस ठाण्यात यावे लागते. शहराच्या ठिकाणी असणाऱ्या या ग्रामीण रुग्णालयात सर्वसामान्य रुग्णांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. बाह्यरुग्ण विभागात दररोज १०० ते १५० पर्यंत रुग्णसंख्या असते. मात्र, गेले तीन ते चार महिने या ठिकाणी डॉक्टर्स उपलब्ध नसल्याने रुग्ण आल्यानंतर त्यांना रत्नागिरी येथे उपचारासाठी पाठवले जात असल्याने आर्थिक भुर्दंडाला सामोरे जावे लागते. मुंबई - गोवा महामार्गावर राजापूर - ओणी सोडल्यानंतर पालीपर्यंत एकही शासकीय रुग्णालय नसल्याने कोणत्याही रुग्णाला पाली किंवा रत्नागिरीच गाठावे लागत असल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.लांजा ग्रामीण रुग्णालय हे मध्यवर्ती ठिकाणचे रु्णालय असल्याने ओणी ते पाली या दरम्यान अपघात झाले तर लांजा ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्याच्या दृष्टीने रुग्ण आणले जातात. शहराच्या वाढत्या लोकसंख्येचा विचार करता व लगत असणाऱ्या गावातील लोकांचा विचार करता लांजा ग्रामीण रुग्णालय अतिशय महत्वाचे आहे.लांजा ग्रामीण रुग्णालयात इतर दवाखान्यातील डॉक्टर यांच्या हंगामी ड्युट्या लावल्या जातात. मात्र ते आपल्या दवाखान्यातील सेवा बजावण्याशिवाय ते लांजा येथे येवू शकत नाही. यामुळे येथे ग्रामीण भागातून आलेला रुग्ण ताटकळत उभा राहून खाजगी रुग्णालयाची वाट धरतो. सध्या या ठिकाणी प्रशिक्षणार्थी डॉक्टर आहेत ते कोणत्या रुग्णाची हमी देऊ शकत नाही, अशी स्थिती आहे. या ठिकाणी उपचार होत नसल्याने एखाद्या मारहाणीत जखमी झालेल्या व्यक्तीस रुग्ण न तपासता रत्नागिरी किंवा पाली शासकीय रुग्णालयात जाऊन तपासणी करुन नंतर आपली तक्रार देण्यासाठी लांजा पोलीस स्टेशनला यावे लागते. यासाठी ग्रामीण रुग्णालय, लांजा येथे तत्काळ डॉक्टरांची उपलब्धता करुन गैरसोय दूर करावी, अशी मागणी केली जात आहे. (प्रतिनिधी)1लांजा येथील रूग्णालयात महामार्गावरील अपघातग्रस्त अनेक रूग्ण दाखल केले जातात. मात्र, येथे जबाबदार वैद्यकीय अधिकारी नसल्याने रूग्णांचे होणारे हाल कमी होण्याऐवजी वाढतच असल्याचे मत लांजा, राजापूर तालुक्यातून व्यक्त केले जात आहे. 2लांजा रूग्णालयात असलेले डॉक्टर्स ड्युटीज लावतात व त्यामुळे कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी नसल्याने असलेल्या डॉक्टर्सवर ताण पडत असून, अशा डॉक्टर्सकडून तत्काळ उपाय करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
लांजा ग्रामीण रुग्णालय आजही डॉक्टर्सविना...
By admin | Published: June 04, 2015 11:24 PM