लांजा : तालुक्यातील वाटूळ - शिपोशी - दाभोळे रस्त्यावर शिपोशी येथे दीड वर्षीय बिबट्या मादीचा उपासमारीने बळी गेला आहे. ही घटना शुक्रवारी दुपारी १ वाजता उघडकीस आली आहे.शिपोशी येथील सुरेश आत्माराम खेडेकर यांच्या रस्त्याकडेला असलेल्या जागेत ही बिबट्या मादी मृतावस्थेत सापडली. दुपारी १ वाजण्याच्या सुमारास येथील ग्रामस्थांनी बिबट्या मृत झाल्याची माहिती वन विभागाला दिली.
त्यानंतर वन परिक्षेत्र अधिकारी प्रियंका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक विक्रम कुंभार, वनरक्षक कोर्ले, सागर पताडे, वन कर्मचारी गोरक्षनाथ खेडेकर यांनी घटनास्थळी जात या बिबट्या मादीची तपासणी केली.या बिबट्याची तपासणी केली असता तिच्या शरीरावर कोणत्याही प्रकारच्या जखमा आढळून आल्या नाहीत. त्यामुळे या वाघिणीचा मृत्यू उपासमारीमुळे झाल्याचा अंदाज वन विभागाकडून वर्तविण्यात आला आहे.
या बिबट्या मादीचे भांबेड येथील वन विभागाच्या नर्सरीत पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अभिजीत कसालकर यांनी शवविच्छेदन केल्यानंतर त्याचठिकाणी तिला अग्नी देण्यात आला. या भागात बिबट्याचे वेळोवेळी दर्शन होत असल्याने या भागात वन विभागाने बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.