रत्नागिरी : कोरोनाच्या छायेतून बाहेर पडताना आता सर्वांच्या सहकार्याने विकासाचे उद्दीष्टसमोर ठेवून आपण आगामी काळात वाटचाल करु, असे प्रतिपादन राज्याचे परिवहन, संसदीय मंत्री तथा पालकमंत्री ॲड. अनिल परब यांनी प्रजासत्ताक दिनी केले.रत्नागिरी जिल्ह्याच्या मुख्य शासकीय सोहळा मंगळवारी येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडिअमवर अनिल परब यांच्या हस्ते पार पडला. यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने, जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्हा पोलीस अधीक्षक मोहितकुमार गर्ग, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी इंदुराणी जाखड यांची प्रमुख उपस्थिती होती.कोविड-१९ च्या महामारीच्या काळात ज्यांनी समाजाचे आरोग्य राखण्यासाठी अपार मेहनत केली अशा सर्वांचा मी यावेळी आवर्जून उल्लेख करतो, असे सांगून पालकमंत्री म्हणाले की, आता लसीकरण सुरु झाले आहे. याची व्यवस्थित आखणी व नियोजन करण्यात आलेले आहे. तरीही कोरोना संपलेला नाही याची जाणीव सर्वांनी ठेवून मास्क, सुरक्षित अंतर आणि सॅनिटायझेशन ही त्रिसुत्री पुढेही सुरू ठेवावी, असे सांगितले.परब म्हणाले की, कोरोना काळात नियोजन निधी प्राधान्याने कोरोनासाठी खर्ची पडला. मात्र आता जनजीवन पूर्वपदावर येत आहे. त्यामुळे येत्या काळात पूर्ण निधी देऊन अडलेली विकासकामे पूर्ण करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.रत्नागिरी जिल्ह्याला लाभलेल्या सागरी किनाऱ्यांचा विकास करुन आगामी काळात हे जागतिक दर्जाचे पर्यटन केंद्र म्हणून विकसीत करण्याचा शासनाचा मानस आहे असे ॲड. अनिल परब म्हणाले. यावेळी पोलीसदल तसेच इतर पथकांनी पालकमंत्र्यांना मानवंदना दिली. शीघ्र कृती दलाचे एक प्रात्यक्षिकही यावेळी करण्यात आले.पालकमंत्री ॲड. अनिल परब यांच्या हस्ते कोविड -१९ मध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या कोविड योध्दांचे, गुणवंत विद्यार्थी, गुणवंत खेळाडू, रत्नागिरी जिल्हा पोलीस दलात उत्कृष्ट काम करणारे पोलीस यांचा सन्मान करण्यात आला. तसेच दिव्यांग व्यक्ती प्रेरणा पुरस्काराचे वितरणही करण्यात आले.
कोरोनातून बाहेर पडताना आता विकासाचे उद्दीष्ट साधू : अनिल परब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2021 4:36 PM
Republic Day Ratnagiri- कोरोनाच्या छायेतून बाहेर पडताना आता सर्वांच्या सहकार्याने विकासाचे उद्दीष्टसमोर ठेवून आपण आगामी काळात वाटचाल करु, असे प्रतिपादन राज्याचे परिवहन, संसदीय मंत्री तथा पालकमंत्री ॲड. अनिल परब यांनी प्रजासत्ताक दिनी केले.
ठळक मुद्देकोरोनातून बाहेर पडताना आता विकासाचे उद्दीष्ट साधू : अनिल परब रत्नागिरीत प्रजासत्ताक दिन सोहळा साजरा