हातखंबा : गणेशोत्सव म्हटले की, अख्खे कोकण मुंबईकरांनी फुलून जाते. मुंबईकर मिळेल त्या गाडीने काेकणात दाखल हाेतात. अनेकजण रात्रीचा प्रवास करून गावी पाेहाेचण्यासाठी धडपडत असतात. रात्रीचा प्रवास करताना वाहनचालकाला झाेप येण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे अपघात हाेण्याची भीती असते. ही बाब लक्षात घेऊन लायन्स क्लब ऑफ हातखंबा राॅयलतर्फे चहा आणि बिस्किटची व्यवस्था केली आहे.
रात्रीची वेळ म्हणजे झोपेची वेळ असते अशा वेळी गणेशोत्सवासाठी येणारे चाकरमानी हे रात्री प्रवास करताना त्यांना चहाची गरज असते. ही गरज लक्षात घेऊन मुंबई-गोवा महामार्गावर हातखंबा तिठा येथे हातखंबा टॅब पोलीस दलाच्या सहकार्याने महामार्गावरील रात्रीचा प्रवास करणाऱ्यांसाठी क्लबतर्फे चहाची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी सुनीलदत्त देसाई, क्लबचे अध्यक्ष मनोजकुमार खानविलकर, खजिनदार गिरीश शितप, अवधूत कळंबटे, सेत लकेश्री, संदेश शिंदे उपस्थित होते. या उपक्रमासाठी उमा विलास लकेश्री यांनी सहकार्य केले.