खेडमध्ये शेतकऱ्यांच्या पशुधनासह पाळीव प्राण्यांचे लाखोंचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:31 AM2021-07-31T04:31:32+5:302021-07-31T04:31:32+5:30
खेड : तालुक्यात झालेल्या अतिवृष्टी व दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये विविध गावांमध्ये शेतकऱ्यांच्या लाखो रुपये किमतीच्या पशुधनाचे व पाळीव प्राण्यांचे ...
खेड : तालुक्यात झालेल्या अतिवृष्टी व दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये विविध गावांमध्ये शेतकऱ्यांच्या लाखो रुपये किमतीच्या पशुधनाचे व पाळीव प्राण्यांचे नुकसान झाले आहे. पंचायत समिती पशुवैद्यकीय विभागाकडून प्राप्त माहितीनुसार, खेड तालुक्यात शेतीसाठी लागणारे बैल, दुधत्या गाई, म्हशी अशा एकूण ६७ पशूंच्या मृत्यूची नोंद करण्यात आली असून, ६० कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. अद्याप गावोगावी पंचनामे सुरू असून, नुकसानाचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
खेड तालुक्यात दि. २१ व २२ जुलै या दोन दिवसात विक्रमी पावसाची नोंद झाली. अतिवृष्टीमुळे तालुक्यातील ग्रामीण भागासह खेड शहराला पुराचा वेढा पडला. ग्रामीण भागात बांदरी पट्टा, पंधरागाव परिसरातील सह्याद्रीच्या रांगांत मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाले. पोसरे गावातील बौद्धवाडी व बिरमणी गावात घरांवर दरड कोसळून माणसांचे जीव गेले तर काही ठिकाणी माणसे पुराच्या पाण्यात वाहून गेली. या महापूर व दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये खेड तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात शेती व पशुधनाचे नुकसान झाल्याची माहिती आता उपलब्ध होत आहे. तालुक्यातील पंचायत समिती पशुसंवर्धन विभाग व राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागातील कर्मचारी याबाबत माहिती संकलित करत असून, दि. २८ जुलैपर्यंत प्राप्त झालेल्या माहितीनुसार ६७ शेती उपयोगी जनावरे व दूध देणारी जनावरे यांचा मृत्यू दरड कोसळून अथवा पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने झाला आहे. तर ६० कोंबड्यांचाही मृत्यू झाला आहे.
तालुक्यातील पोसरे गावात बौद्धवाडीमध्ये झालेल्या दरड दुर्घटनेत २४ जनावरांचा मृत्यू झाला आहे तर १० शेळ्या व ६० कोंबड्यांचाही मृत्यू झाला आहे. चोरवणे - गणपतीवाडी येथे २४ जनावरे, चोरवणे येथे १, आंबडस येथे २, बिरमणी येथे ५ जनावरे, अलसुरे गावात ३ जनावरे, खोपी येथे २ जनावरे, तळवट येथे १ जनावर, सुकिवली येथे एका जनावराचा मृत्यू झाल्याची माहिती दि. २८ जुलैपर्यंत प्राप्त पंचनाम्यातून समोर आली आहे. तालुक्यातील ग्रामीण भागात शेतकऱ्यांचे पशुधन व पाळीव प्राणी, पक्षी यांच्या झालेल्या मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू असून, लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची भीती व्यक्त होत आहे.