हरवलेली वेदा तिच्या आईपर्यंत पोहोचली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2020 02:29 PM2020-02-26T14:29:41+5:302020-02-26T14:32:30+5:30
आईसोबत आठवडा बाजारात आलेली चार वर्षाची चिमुकली आईचा हात सुटल्यामुळे बाजारात हरवली. मात्र, दोन चाणाक्ष महिलांमुळे थोड्याचवेळात ती तिच्या आईपर्यंत पोहोचू शकली.
लांजा : आईसोबत आठवडा बाजारात आलेली चार वर्षाची चिमुकली आईचा हात सुटल्यामुळे बाजारात हरवली. मात्र, दोन चाणाक्ष महिलांमुळे थोड्याचवेळात ती तिच्या आईपर्यंत पोहोचू शकली.
लांजातील आठवडा बाजाराला वेरवली बुद्रुक येथील तन्वी जयेश राहुल या आपली चार वर्षांची मुलगी वेदा हिला घेऊन आल्या होत्या. बाजाराच्या मध्य ठिकाणी आल्यानंतर दुपारी १.४५ वाजण्याच्या सुमारास वेदाने आईचा हात सोडला आणि ती बाजूला गेली.
वस्तू खरेदी झाल्यानंतर तन्वी यांना वेदा दिसली नाही. त्यांनी आजूबाजूला शोध घेतला. मात्र वेदा न दिसल्यामुळे त्यांनी रडत रडतच पोलीस स्थानक गाठले. त्या रडत जाताना लांजा येथील रिक्षाचालक पप्पू शेलार यांनी पाहिले. रिक्षातील भाडे सोडताना त्यांनी दोन महिला एका छोट्या मुलीला नाव, गाव विचारताना पाहिले.
धनश्री भागवत ठणके (कुरूपवाडी) व शरयु विजय गाडे (राजयोग पार्क) या दोन महिला ओळखीच्या असल्याने पप्पू त्यांच्या मदतीला धावला. वेदाने आपले नाव सांगितले, मात्र तिने सांगितलेले गावाचे नाव चुकीचे होते. त्यामुळे सगळे हतबल झाले.
ही मुलगी १० मिनिटांपूर्वी पोलीस स्थानकाकडे रडत गेलेल्या महिलेची असावी, असा अंदाज बांधून पप्पू शेलार, धनश्री ठणके व शरयु गाडे हे सर्वजण वेदाला घेऊन पोलीस स्थानकात आला. रिक्षातून वेदा बाहेर आल्यानंतर तिच्या आईने तिला घट्ट मिठी मारली व रडू लागली. धनश्री व शरयु या दोन महिलांच्या चाणाक्षपणामुळे मुलगी आणि आईची भेट झाली. लांजाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय चौधरी यांनी त्यांचे अभिनंदन केले. तन्वी यांनी धनश्री व शरयु यांचे आभार मानले.