महापुराला जबाबदार प्रशासकीय अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:33 AM2021-07-30T04:33:55+5:302021-07-30T04:33:55+5:30
चिपळूण : चिपळूणच्या महापुराला प्रशासन जबाबदार असून, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक तसेच चिपळूण नगर परिषदेचे ...
चिपळूण : चिपळूणच्या महापुराला प्रशासन जबाबदार असून, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक तसेच चिपळूण नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी भाजप प्रदेश उपाध्यक्ष व आमदार प्रसाद लाड यांनी पत्रकार परिषदेत केली. तसेच ज्या लोकांनी वीज निर्मितीचे पाणी सोडण्याचे पाप करून व्यापारी व नागरिकांचे नुकसान केले, ते महाजनको, महाजनरेशन या नुकसानाची जबाबदारी घेणार का, असा प्रश्नही त्यांनी विचारला. सात दिवसानंतरही पूरग्रस्तांना मदत मिळाली नसल्याबद्दलही त्यांनी कडाडून टीका केली.
महापुरामुळे चिपळूणवासीयांचे जनजीवनच उद्ध्वस्त झाले असून, या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी भाजप प्रदेश उपाध्यक्ष आमदार प्रसाद लाड हे गुरुवारी चिपळूण दौऱ्यावर आले होते. यावेळी कापसाळ येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, महापूर ओसरल्यानंतर भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने चिपळुणात मदतकार्याला जोरात सुरुवात केली आहे. आम्हीही पूरग्रस्तांसाठी मदत आणली आहे. याकरिता भारतीय युवा मोर्चा मुंबई अध्यक्षांनी मोलाचे सहकार्य केले आहे.
चिपळूणमध्ये पाणी का भरले, याचा आतापर्यंत कोणीही उहापोह केलेला नाही. आपला असं म्हणणं आहे की, वीज निर्मितीनंतर पाणी सोडले जाते, त्यावेळी नदीच्या ओघाने आणि भरतीच्या वेळी चिपळूण शहरात पाणी भरते. सर्वसामान्य एस. टी. चालकाने बस पाण्यातून चालवली, तर त्या चालकाचे निलंबन केले जाते. परंतु, ज्या लोकांनी वीज निर्मितीचे पाणी सोडण्याचा पाप केले, ज्यामुळे साडेचार हजार व्यापारी, २० हजार नागरिक, शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, या नुकसानाची जबाबदारी महाजनको, महाजनरेशन घेणार का? असा प्रश्न त्यांनी केला. याविषयी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार असल्याचेही ते म्हणाले.
................
पूरग्रस्तांना तत्काळ मदत द्यावी
चिपळूणच्या पूरग्रस्त व्यापाऱ्यांना तत्काळ १ लाख रुपये तर ज्यांच्या घरात पाणी गेले आहे, त्या पूरग्रस्तांना ५० हजार रुपये कोणतेही पंचनामे न करता द्यावेत, अशी आमची शासनाकडे मागणी असल्याचे त्यांनी सांगितले.
...................
एकनाथ शिंदेंच्या वक्तव्याचा निषेध
नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची टीव्हीवर बातमी पाहिली. ते म्हणतात की, पंचनामे अजून झालेले नसल्यामुळे मदतीचा निर्णय घेतलेला नाही. या वक्तव्याचा आपण निषेध करतो. पंचनामे होण्यापेक्षा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना सांगली, कोल्हापूरमधील पूरग्रस्तांना तत्काळ ५० हजार रुपयांची मदत केली होती. तशीच मदत चिपळूणसह महाड, सांगली, कोल्हापूरमधील पूरग्रस्तांना द्यावी, अशी आपली मागणी असल्याचे आमदार लाड यांनी सांगितले.
चाैकट
महापुराचा पर्यटन दौरा होऊ नये
कोणत्याही पुराचा पर्यटन दौरा होऊ नये. याठिकाणी येताना मदतीचा ओघ आणावा म्हणजे चिपळूणवासीयांना दिलासा मिळेल, अशा शब्दात सेनेच्या लोकप्रतिनिधींच्या सातत्याने होत असलेल्या दौऱ्यांबाबत लाड यांनी टीका केली.