मंडळांना लागले नवरात्रोत्सवाचे वेध, दोन वर्षानंतर घुमणार गरबा; तरूणाईंमध्ये उत्साह
By मेहरून नाकाडे | Published: September 17, 2022 01:12 PM2022-09-17T13:12:04+5:302022-09-17T13:13:14+5:30
अवघे आठ दिवस शिल्लक राहिल्याने भाविकांचाही उत्साह वाढला आहे. दांडिया स्पर्धंतील बक्षिसे मिळविण्यासाठी दांडिया ग्रुपची तयारी
रत्नागिरी : गेले दोन वर्षे कोरोनामुळे नवरात्रोत्सवावर शासकीय निर्बंध होते. मात्र यावर्षी निर्बंधच रद्द करण्यात आल्याने मंडळाना नवरात्रोत्सवाचे वेध लागले आहेत. मंडळांकडून जय्यत तयारी सुरू आहे. दोन वर्षानंतर गरबा घुमणार असल्याने तरूणाईंमध्ये उत्साह निर्माण झाला आहे.
जिल्ह्यात सार्वजनिक ३९५ व खासगी ५२ मिळून एकूण ४४७ दूगार्मातेची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. कोरोनामुळे आलेला निरूत्साह झटकून भाविकांमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे. गरबा, दांडियासाठी परवानगी परवानगी दिली असल्याने विविध मंडळे, राजकीय पक्षांकडून दांडिया नृत्य स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. राजकीय पक्षांमध्ये चुरस निर्माण झाल्याने बक्षिसांच्या रकमेत चढाओढ सुरू झाली आहे.
जिल्ह्यातील सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाची तयारी सुरू झाली आहे. कोरोना काळात दोन ते चार फूटापर्यत मूर्तीच्या उंचीची अट शासनाने रद्द केली आहे. मंडप उभारण्याचे काम सुरू झाले आहे. मूर्तीकारही मूर्ती घडविण्याच्या कामात व्यस्त आहेत. अवघे आठ दिवस शिल्लक राहिल्याने भाविकांचाही उत्साह वाढला आहे. दांडिया स्पर्धंतील बक्षिसे मिळविण्यासाठी दांडिया ग्रुपची तयारी सुरू आहे. दांडियासाठी फॅन्सी दांडिया, विशेष कपडे, त्यावर सुसंगत ज्वेलरी बाजारात विक्रीसाठी आल्या आहेत. दांडिया स्पर्धेसाठी खास ऑर्केस्ट्रा, गायक, वाद्यवृंदासाठी आधीच बुकींग सुरू आहे. पावसामुळे उत्सवावर विघ्न येऊ नये यासाठी वॉटरप्रूफ मंडप उभारण्यात आले आहेत.