थंडीमुळे आंबा बागायतदारांच्या आशा पल्लवित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2019 02:28 PM2019-11-12T14:28:40+5:302019-11-12T14:29:59+5:30
पावसाळा लांबल्याने हिवाळ्याचेही आगमन उशिरा झाले आहे. गेले दोन दिवस पहाटे चांगले धुके पडत असून, थंडीही पडू लागली आहे. थंडीमुळे बागायतदारांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. कोकणचे अर्थकारण अवलंबून असलेल्या हापूस आंब्याला थंडीमुळे मोहोर सुरु होतो. यावर्षी पावसाळ्यामुळे एक ते दीड महिना हंगाम उशिरा सुरु होण्याची शक्यता आहे.
रत्नागिरी : पावसाळा लांबल्याने हिवाळ्याचेही आगमन उशिरा झाले आहे. गेले दोन दिवस पहाटे चांगले धुके पडत असून, थंडीही पडू लागली आहे. थंडीमुळे बागायतदारांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. कोकणचे अर्थकारण अवलंबून असलेल्या हापूस आंब्याला थंडीमुळे मोहोर सुरु होतो. यावर्षी पावसाळ्यामुळे एक ते दीड महिना हंगाम उशिरा सुरु होण्याची शक्यता आहे.
अद्याप जमिनीमध्ये ओलावा टिकून असल्यामुळे कलमांना पालवी येण्याचे प्रमाण वाढले आहे. ८० टक्के कलमांना सध्या पालवी आहे. पालवी जून होण्यासाठी किमान ४० ते ४५ दिवसाचा कालावधी लागतो. त्यानंतर मोहोर प्रक्रिया सुरु होते. गेले दोन दिवस थंडी सुरु झाल्यामुळे जानेवारीमध्ये मोहोर प्रक्रिया सुरु होण्याची शक्यता आहे.
जानेवारीमध्ये पारा प्रचंड खाली येतो. नीचांक हवामानामुळे आंब्याच्या मोहोरावर परिणाम होतो. बहुतांश मोहोरावर फळधारणा होत नाही. शिवाय पुनर्मोहोरदेखील होत असल्याने या हंगामात मोहोर आला तर हे दुहेरी संकट शेतकऱ्यांना झेलावे लागणार आहे. मोहोर वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना वेळोवेळी हवामानाचा अंदाज घेऊन कीटक नाशकांची फवारणी करावी लागणार आहे.
आॅक्टोबर हिटमुळे जमिनीतील ओलावा नष्ट होऊन कलमांच्या मुळांना ताण देऊन मोहोर प्रक्रिया सुरु होते. मतलई वाºयामुळे हवेमध्ये गारवा निर्माण होतो, थंडीमुळे मोहोर प्रक्रिया वेगाने होते. मात्र, अद्याप थंडी फारशी नसल्याने मोहोर प्रक्रियेला वेळ लागणार आहे. सध्या २० टक्के उर्वरित कलमांना थंडीमुळे मोहोर येण्याची शक्यता आहे. परंतु पालवी सुरु झाल्यास हंगाम उशिरा सुरु होण्याची शक्यता आहे.
जास्त थंडीमुळे तसेच ढगाळ हवामानामुळे थ्रीप्स, बुरशी, तुडतुडासारख्या कीटकांचा प्रभाव वाढू शकतो. गतवर्षीदेखील थ्रीप्स व तुडतुड्यामुळे बागायतदार हैराण झाले होते. यावर्षी नियंत्रण मिळविण्यासाठी दोन ते तीन आठवड्याच्या फरकाने हवामानाचा अंदाज घेत कीटकनाशकांची फवारणी करावी लागते, त्यामुळे खर्च वाढतो. सध्या बागायतदारांनी पालवीचे संरक्षण करण्यासाठी कीटकनाशक फवारणी सुरु केली आहे.
हवामानावर अवलंबून असलेल्या आंबा पिकाचा हंगाम यावर्षी एक ते दीड महिना उशिरा होणार आहे. सध्या सर्वत्र पालवी आहे. त्यामुळे पालवी जून होऊन मोहोर येण्यास जानेवारी उजाडणार आहे. त्यामुळे हा आंबा मे महिन्यातच बाजारात येण्याची शक्यता असून, एकाचवेळी आंबा बाजारात आला तर दरावर त्याचा परिणाम होऊ शकतो. खत व्यवस्थापनापासून आंबा काढणीपर्यंत प्रचंड खर्च केला जातो, त्या तुलनेत आंब्याला दर प्राप्त होत नसल्याने शेतकरी बांधव दरवर्षी आर्थिक दुष्टचक्रात सापडत आहेत. बदलत्या हवामानामुळे पिकावर परिणाम होत असल्याने आंबा पीक खर्चिक बनले आहे.
- एम. एम. गुरव,
आंबा बागायतदार, रत्नागिरी