रत्नागिरी : रत्नागिरी तसेच जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी जालना येथे दिनांक १ ते ३ जून या कालावधीत आंबा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाच्या पहिल्या दोन दिवसातच हापूसच्या दीड हजार पेट्यांची लक्षणीय विक्री झाली.
सोमवारपर्यंत असलेल्या या प्रदर्शनात जिल्ह्यातील आणखी काही शेतकरी सहभागी होणार असल्याची माहिती रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मधुकर दळवी यांनी दिली.रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मधुकर दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील अनेक शेतकरी या महोत्सवात सहभागी झाले आहेत. याआधीही मुंबई, औरंगाबाद याठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या आंबा महोत्सवात जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा सहभाग होता. औरंगाबाद येथील पाच दिवसांच्या महोत्सवात रत्नागिरीतून आणलेल्या दोन हजार पेट्यांची विक्री झाली.त्यानंतर जालना येथे जालना कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे रत्नागिरी आणि जालना या दोन्ही जिल्ह्यांतील शेतकऱ्यांसाठी तीन दिवसांचा आंबा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यातून आंबा उत्पादक शेतकरी हे थेट ग्राहकांपर्यंत नैसर्गिकरित्या पिकवलेला अस्सल हापूस, केसर, लालबाग, बदाम, दसेरी, पायरी आंबा घेऊन जात आहेत. याला ग्राहकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे.
या आंबा महोत्सवात मधुकर दळवी यांच्यासह लांजाचे संजय खानविलकर, रत्नागिरीचे नीलेश चव्हाण, उदय पेठे, मुजीब काळसेकर, शाहीन खान, विजय मोहिते, विपुल वेदरे, शरद गोणबरे, पंकज वेदरे, आदी आंबा उत्पादक शेतकरी सहभागी झाले आहेत.शनिवारी पहिल्याच दिवशी पाचशे पेट्यांतील आंबा विकला गेला तर रविवारी आणखी हजार पेट्यांची विक्री झाली. रत्नागिरी जिल्ह्यातील काही शेतकरी या प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी रवाना झाले आहेत. त्यामुळे आंब्याची अधिक उपलब्धता होणार असेल तर रमजान ईदपर्यंत याठिकाणी आंबा विक्रीसाठी ठेवला जाणार आहे, अशी माहिती मधुकर दळवी यांनी दिली.