खेडमध्ये बाजारपेठ अंशतः बंद; जनतेत अनास्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:33 AM2021-04-09T04:33:26+5:302021-04-09T04:33:26+5:30
khed-photo81 खेड शहरातील काही भागातील दुकाने व्यापाऱ्यांनी बंद ठेवली होती. लाेकमत न्यूज नेटवर्क खेड : व्यापारी आणि नगर परिषद ...
khed-photo81 खेड शहरातील काही भागातील दुकाने व्यापाऱ्यांनी बंद ठेवली होती.
लाेकमत न्यूज नेटवर्क
खेड : व्यापारी आणि नगर परिषद प्रशासन यांच्यात झालेल्या बैठकीत गुरूवारपासून दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला हाेता. मात्र, गुरूवारी प्रत्यक्षात खेड बाजारपेठेतील काही दुकाने सुरू ठेवण्यात आली हाेती. त्यामुळे बाजारात आलेल्या नागरिकांमध्येही बंदबाबत संभ्रम निर्माण झाला हाेता.
मिनी लॉकडाऊनच्या निर्णयाला खेडमधील व्यापाऱ्यांनी विरोध दर्शवला आहे. मंगळवार, ६ एप्रिल रोजी प्रशासनाने शहरातील बाजारपेठेत फिरून दुकाने बंद करण्याची सक्ती केल्यानंतर व्यापारी संतप्त झाले आणि त्यांनी नगर परिषदेत धाव घेतली. यावेळी प्रशासकीय अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती करून निरुत्तर केले. मात्र, याचवेळी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी सायंकाळी बैठक घेण्याचे निश्चित करून व्यापाऱ्यांना शांत केले. मंगळवारी सायंकाळी ५ वाजता झालेल्या बैठकीत कोणताही निर्णय न झाल्याने अखेर बुधवार, ७ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता पुन्हा एकदा व्यापाऱ्यांची प्रशासनाने बैठकीत समजूत काढली व व्यापाऱ्यांनी गुरुवारपासून दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. मात्र, गुरूवारी प्रत्यक्षात बाजारपेठ अंशतः बंद असल्याचे दिसत होते. महामार्गावर भरणे नाका येथे अत्यावश्यक सेवेची दुकाने वगळता उर्वरित दुकाने बंद ठेवण्यात आली हाेती. शहरातील अनेक व्यापाऱ्यांनी अर्धवट शटर उघडी ठेवली हाेती. हॉटेल, बार व चायनीज रेस्टॉरंटमध्ये पार्सल सुविधा सुरु होती.
सद्यस्थितीत तालुक्यात १०९ ॲक्टिव्ह रुग्ण असून, दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत आहे. आतापर्यंत ८३ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे. मात्र, खेडमध्ये जनतेत गांभीर्य नसल्याचे पाहायला मिळत आहे. व्यापारी संघटना हतबल झाली असून, शहरात काही व्यापारी प्रशासनाला सहकार्य करून निर्बंधांचे पालन करत आहेत. मात्र, काही व्यापारी कोरोनाची साखळी तोडण्यासाठी व्यवहार बंद न करता, पोलीस व प्रशासनाला जाहीरपणे कारवाई करा, अशी चिथावणी देत आहेत. तालुक्यातील सर्वच राजकीय पक्ष या परिस्थितीत केवळ संदिग्ध भूमिका घेत असून, व्यापारी व जनतेत जनजागृती करण्यात अपयशी ठरले आहेत.