फोटो ओळी : कार्यक्रमात मार्गदर्शन करताना डाॅ. ज्योती पेटकर. सोबत प्राचार्य रामचंद्र कापसे, योगेशकुमार केसरे.
लाेकमत न्यूज नेटवर्क
मंडणगड : स्त्रियांना कुटुंबात व कामाच्या ठिकाणी स्वतःच्या विकासाची पूर्ण संधी उपलब्ध करून देणे, निर्णय घेण्याचे अधिकार, समान दर्जा, समान हक्क मिळाले तर स्त्रियांचे सबलीकरण होण्यास वेळ लागणार नाही. त्याकरिता यामध्ये पुरुषांच्या सहभागाची गरज आहे, असे उद्गार मंडणगड येथील लोकनेते गोपीनाथजी मुंडे महाविद्यालयाच्या डाॅ.ज्योती पेठकर यांनी काढले.
देव्हारे पंचक्रोशी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या अभियानांतर्गत मुलींसाठी करिअर मार्गदर्शन व उद्बोधन कार्यशाळेचे आयोजन केले होते. त्यात प्रमुख पाहुण्या व मार्गदर्शिका म्हणून त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य रामचंद्र कापसे होते. यावेळी सहायक शिक्षक योगेशकुमार केसरे, वैभव पाध्ये, महेश तांबडे आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रास्ताविक वैभव पाध्ये यांनी केले. त्यानंतर महाविद्यालयाची विद्यार्थिनी अंजली जाधव हिने मनोगत व्यक्त केले. मुलीकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात मोठा बदल घडवून आणण्याची आवश्यकता असल्याचे अध्यक्ष प्राचार्य कापसे यांनी सांगितले. कार्यक्रमास हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. योगेशकुमार केसरे यांनी आभार मानले.