रत्नागिरी : पाली बसस्थानकातून विद्यार्थी पास देत असताना पासाची किमत १८७ रूपये असताना २०० रूपये वसूल करण्यात आले. सुटे पैसे नसल्याचे सांगून वाहतूक नियंत्रकांनी गैरव्यवहार केला असल्याने रत्नागिरी विभागातर्फे एकाला निलंबित, तर दुसऱ्याला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.पाली हायस्कूलमधील १२२ विद्यार्थ्यांकडून पासाचे १८० रूपये, पास अर्ज चार रूपये व ओळखपत्राचे तीन रूपये मिळून १८७ रूपये वसूल करणे अपेक्षित असताना विद्यार्थ्यांकडून २०० रूपये घेण्यात आले.
प्रत्येक १३ रूपये अधिक वसूल करण्यात आले असल्याची लेखी तक्रार विद्यार्थ्यांनी केली आहे. त्यावर वाहतूक नियंत्रक आखाडे व पेटकर यांनी विद्यार्थ्यांना पैसे सुटे नसल्याचे सांगून फसवणूक केली आहे. रत्नागिरी विभागाकडे याबाबत तक्रार येताच प्रशासनाकडून पाली परिसरातील अन्य शाळांमध्ये अधिकारीवर्गाने विद्यार्थ्यांशी संवाद साधला असताना सामंत महाविद्यालयातील ५० विद्यार्थ्यांचीही अशाच प्रकारे फसवणूक झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्याबाबत चौकशी सुरू करण्यात आली आहे.
प्रशासनाने या बाबीची गंभीर दखल घेत पास वितरण करणाऱ्या सर्व आगारांमध्ये तपासणी सुरू केली आहे. वाहतूक नियंत्रक आखाडे यांना निलंबित करण्यात आले असून, पेटकर यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.ग्रामीण भागातून शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांकडून जादाची रक्कम वसूल करणे बेकायदेशीर आहे. पासाची किमंत, अर्ज, ओळखपत्राची रक्कम वसूल करणे उचित आहे. मात्र, अशा प्रकारे अधिक रक्कम वसूल करणारे अधिकारी आढळले तर त्यावर तत्काळ कारवाई करण्यात येणार असल्याचे विभाग नियंत्रक विजय दिवटे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. पालीमध्ये घडलेल्या प्रकाराबाबत अधिक चौकशी सुरू आहे. शिवाय आगारनिहाय पास वितरण करणाऱ्या विभागातही तपासणीचे आदेश देण्यात आले आहेत.