आमदार राजन साळवींसह भावाला सोमवारी हजर राहण्याची नोटीस, रत्नागिरी एसीबी'ची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2024 01:02 PM2024-01-20T13:02:38+5:302024-01-20T13:02:55+5:30
'अटक होईल असे वाटत होते'
रत्नागिरी : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने माझ्यासह पत्नी व मुलावर गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर या विभागाने माझ्या भावाकडे मोर्चा वळवला असून, मला व भाऊ दीपक प्रभाकर साळवी यांना २२ जानेवारी राेजी दुपारी १२ वाजता कार्यालयात हजर राहण्याची नोटीस बजावली आहे, अशी माहिती आमदार राजन साळवी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
बेहिशेबी मालमत्ता जमविल्याच्या आराेपाखाली आमदार साळवी यांच्यासह पत्नी अनुजा आणि मुलगा शुभम यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर गुरुवारी अचानक सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी अचानक आमदार राजन साळवी यांच्या घरासह ७ ठिकाणी छापे टाकले. सायंकाळी ७ वाजेपर्यंत त्यांच्या घराची झाडाझडती सुरू होती. त्याचवेळी त्यांच्या रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेतील लॉकरचीही तपासणी केली होती.
रत्नागिरीतील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपाधीक्षक सुशांत चव्हाण यांनी शुक्रवारी आमदार साळवी यांच्या भावाला नोटीस बजावली आहे. याबाबत साळवी यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. मला व माझ्या भावाला कार्यालयात हजर राहण्यास सांगितल्याचे त्यांनी सांगितले. माझे संपूर्ण कुटुंब माझ्या पाठीशी आहे. आम्ही कोणताही निर्णय एकत्रित बसून घेतो. त्यामुळे कोणत्याही कारवाईला सामोरे जाण्यास आपण तयार असल्याचे त्यांनी सांगितले.
यापूर्वीही माझा भाऊ दीपक यांना रायगडला चौकशीसाठी बोलावले होते. त्यावेळीही ते चौकशीला सामोरे गेले होते. यापुढे माझा छोटा भाऊ संजय साळवी यालाही चौकशीसाठी बोलावू शकतात, असेही त्यांनी सांगितले. यापूर्वी राजापूर, लांजामध्ये छोटे-मोठ्या विकासकामांचे ठेके घेणाऱ्या ७० जणांनाही रायगड येथील लाचलुचपत विभागाने चौकशीसाठी बोलावले होते, असेही त्यांनी सांगितले.
अटक होईल असे वाटत होते
आपल्याला शुक्रवारी सकाळी अटक करतील असे वाटत होते; पण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपाधीक्षक सुशांत चव्हाण यांनी हजर राहण्याची नोटीस बजावली आहे. त्यामध्ये आपल्यासह माझे बंधू दीपक साळवी यांनाही हजर राहण्यास सांगितल्याचे ते म्हणाले.
कुटुंबाला त्रास देण्यासाठी कारवाई
आमदार साळवी यांच्या भावाला चौकशीला बोलावल्यावर त्यांनी आमच्या कुटुंबाला त्रास देण्यासाठीच ही कारवाई सुरू केली आहे. मात्र, आम्ही न डगमगता या कारवाईला सामोरे जाणार आहोत, असे सांगितले.