रत्नागिरी : राजापूरचे आमदार राजन साळवी यांच्या मालमत्तेची चाैकशी करण्यासाठी रायगड येथील लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाने नाेटीस बजावली आहे. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाकडून शनिवारी (४ मार्च) त्यांच्या रत्नागिरीतील राहत्या घराचे माेजमाप करण्यात आले. डाेळ्यादेखत घराचे माेजमाप हाेताना पाहून आमदार राजन साळवी यांना अश्रू अनावर झाले.आमदार राजन साळवी यांच्या रत्नागिरीतील राहत्या घराचे माेजमाप हाेत असताना ते आणि त्यांच्या पत्नी अनुजा साळवी याही उपस्थित हाेत्या. या माेजमापानंतर हा माझ्या आयुष्यातील दु:खद क्षण असून, चित्रपटात जशी जप्तीची कारवाई पाहताे त्यापद्धतीने आज पाहायला मिळाल्याचे आमदार राजन साळवी म्हणाले.आमदार साळवी यांच्या मालमत्तेबाबत रायगड लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाने डिसेंबर महिन्यात त्यांना चौकशीची नोटीस पाठविली होती. १३ जानेवारीला ते चौकशीला हजर राहिल्यानंतर २० जानेवारी रोजी मालमत्तेची कागदपत्रे घेऊन चौकशीसाठी हजर राहिले होते. त्यानंतर बुधवार, २२ फेब्रुवारी रोजी आमदार साळवी यांनी अलिबाग येथे आपली कागदपत्रे सादर केली हाेती. आमदार साळवी यांच्याबराेबरच त्यांचे स्वीय सहायक सुभाष मालप यांनाही नाेटीस बजावून चाैकशी करण्यात आली आहे.आमदार साळवी यांनी कागदपत्रे सादर केल्यानंतर रत्नागिरी सार्वजनिक विभागाने २७ फेब्रुवारी राेजी रत्नागिरीतील आमदार साळवी यांचे घर आणि हाॅटेल यांचे माेजमाप केले. त्यानंतर शनिवारी आमदार साळवी घरात देवपूजा करत असताना बांधकाम विभागाचे अधिकारी घरात धडकले. त्यांनी घराच्या माेजमापासह घरातील सामानाचे मूल्यांकन केले.
डाेळ्यादेखत घराचे माेजमाप हाेताना आमदार राजन साळवींना अश्रू अनावर
By अरुण आडिवरेकर | Published: March 04, 2023 6:40 PM