शिवसेना ठाकरे गटाच्या आमदाराची चक्क सत्ताधाऱ्यांकडून पाठराखण, चर्चेला उधाण
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2022 12:32 PM2022-12-01T12:32:49+5:302022-12-01T12:33:43+5:30
हे प्रेम नव्या राजकारणाची नांदी आहे का, असा प्रश्न आता राजकीय वर्तुळात पुढे येत आहे.
रत्नागिरी : गेल्या काही दिवसांत रत्नागिरीच्याराजकारणात नकळत मोठे बदल होऊ लागले आहेत. उद्धव ठाकरे शिवसेनेकडून रिफायनरीच्या समर्थनाचा लढा एकट्यानेच लढणाऱ्या आमदार राजन साळवी यांना सत्ताधारी पक्षाकडून चांगला पाठिंबा दिला जात आहे. सत्ताधारी पक्षाचे आमदार साळवी यांच्यावरील हे प्रेम नव्या राजकारणाची नांदी आहे का, असा प्रश्न आता राजकीय वर्तुळात पुढे येत आहे.
शिंदे गटाने स्वतंत्र भूमिका घेतल्यानंतर राजापूरचे आमदार राजन साळवी हेही शिंदे गटात सहभागी हाेतील, असा अंदाज होता. मात्र, आमदार साळवी यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतच राहण्याची भूमिका घेतली. त्याची दखल घेत पक्षाने त्यांना उपनेतेपद दिले. त्यामुळे जिल्ह्याची पक्षाची सूत्रे त्यांच्याकडे सोपवली जातील, असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र, काही दिवसांतच पक्षाने गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांना शिवसेनेचे नेतेपद दिले. त्यावरून साळवी यांच्या समर्थकांमध्ये काहीशी नाराजी पसरली होती.
शिंदे- फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर आमदार साळवी शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा अनेकदा रंगली. प्रत्येकवेळा आमदार साळवी यांनी त्याचा इन्कार केला. तरीही या चर्चा थांबलेल्या नाहीत. दरवेळी नव्या नव्या मुद्द्यांवरून याबाबतची चर्चा सुरूच आहे. गेल्या काही दिवसात ऊर्जामंत्री उदय सामंत यांनी त्यांची पाठराखण सुरू केल्यामुळे पुन्हा एकदा याबाबतची चर्चा सुरू झाली आहे.
केसालाही धक्का लागू देणार नाही
आमदार राजन साळवी यांनी रिफायनरीच्या समर्थनाची भूमिका घेतली असल्याने प्रकल्प परिसरात साळवी यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. या एकूणच पार्श्वभूमीवर ऊर्जामंत्री उदय सामंत यांनी खणखणीत भूमिका घेत आमदार साळवी यांच्या केसालाही धक्का लागू देणार नाही, असे ठणकावले आहे. याआधीही त्यांना सुरक्षा देण्यातही मंत्री सामंत यांनी पुढाकार घेतला होता.
सामंजस्याचे राजकारण
मंत्री उदय सामंत यांनी गेल्या काही वर्षांत आपल्या कामाच्या पद्धतीत मोठा बदल केला आहे. त्यांनी कोणत्याही नेत्याविरोधात आक्रमक, प्रक्षोभक किंवा खालच्या थराचे वक्तव्य त्यांनी केलेले नाही. टोकाची टीका केलेल्या खासदारांनाही त्यांनी कोणतेही उत्तर दिलेले नाही. मात्र, आमदार साळवी यांच्याबाबत त्यांची भूमिका अधिकच मऊ असल्याचे गेल्या काही दिवसात प्रकर्षाने पुढे येत आहे. ते आमदार साळवी यांचे वारंवार कौतुक करत असल्याचे दिसत आहे. त्यामुळेच रत्नागिरीच्या राजकारणात काही ना काही उलथापालथी होण्याची अपेक्षा केली जात आहे.
मंत्रालयातील बैठकीत कौतुक
रिफायनरीबाबत मंत्रालयात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत मंत्री उदय सामंत यांनी आमदार राजन साळवी यांनी घेतलेल्या भूमिकेचे खूप मोठ्या प्रमाणात कौतुक केले होते. आमदार साळवी यांनी मांडलेल्या मागण्यांना त्यांनी सरकारतर्फे तत्काळ हिरवा कंदिलही दाखवला. बैठकीनंतरच्या पत्रकार परिषदेतही त्यांनी आमदार साळवी यांचे विशेष कौतुक केले. त्यांनी केलेल्या या कौतुकामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.