माेबाईल व्हॅन देणार ग्राहकांना बँकेच्या याेजनांची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:22 AM2021-06-18T04:22:29+5:302021-06-18T04:22:29+5:30
राजापूर : रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेने नाबार्डच्या सहकार्यातून ग्राहकांच्या सेवेसाठी एटीएम सेंटरची सुविधा असलेली व बँकेच्या योजनांची माहिती देणारी ...
राजापूर : रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेने नाबार्डच्या सहकार्यातून ग्राहकांच्या सेवेसाठी एटीएम सेंटरची सुविधा असलेली व बँकेच्या योजनांची माहिती देणारी मोबाईल व्हॅन उपलब्ध करून दिली आहे. या मोबाईल व्हॅनचे गुरुवारी राजापुरात जिल्हा बँक राजापूर शाखा व क्षेत्रीय कार्यालयातर्फे स्वागत करण्यात आले. यावेळी या मोबाईल व्हॅनमधील एटीएम सुविधेचा अनेकांनी लाभ घेतला.
रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतर्फे ग्राहकांना नवनवीन सेवा सुविधा पुरविल्या जात आहेत. बँकेची एटीएम सुविधा सर्वत्र कार्यरत आहे़ बँकेच्या या मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून अगदी तळागाळातील ग्राहकापर्यंत पोहोचून त्याला बँकेच्या विविध योजनांची माहिती देतानाच त्या ग्राहकाला या मोबाईल व्हॅनमधील एटीएमचा लाभ घेता यावा यासाठी बँकेने ही खास मोबाईल व्हॅन कार्यरत केली आहे.
गुुरुवारी १७ जून रोजी प्रथमच राजापुरात दाखल झालेल्या या मोबाईल व्हॅनचे राजापुरात जिल्हा बँकेच्या राजापूर शाखा व क्षेत्रीय कार्यालयासमोर संचालक मनोहर सप्रे, शंकर टिळेकर, अमजद बोरकर यांनी स्वागत केले. यावेळी बँकेचे सहायक व्यवस्थापक संजय बाकाळकर, शाखाधिकारी आर. डी. जाधव, तुषार साळुंखे, अभिजित सूद उपस्थित होते. या मोबाईल व्हॅनच्या सेवेबाबत राजापूर पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर यांच्यासह अनेकांनी माहिती घेत लाभ घेतला.