रत्नागिरी : विविध समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटविणारे रत्नागिरीचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांची जळगाव येथे बदली झाली आहे. गडचिरोलीचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. मोहित कुमार गर्ग यांची रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आठवडाभरात डॉ. गर्ग आपल्या पदाचा पदभार स्वीकारणार आहेत.डॉ. प्रवीण मुंढे यांनी दोन वर्षापूर्वी पुणे येथून रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारला होता. सर्व सामान्य जनतेला पोलिसांचे मित्र बनवून अनेक समाजपयोगी उपक्रम त्यांनी जिल्ह्यात राबविले होते. पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना त्यांच्या इच्छेनुसार बदल्या करण्याचा पायंडा डॉ. प्रवीण मुंढे यांनी घातला होता.
त्यामुळे अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांमध्ये डॉ. मुंढे लोकप्रिय झाले होते. डॉ. प्रवीण मुंढे कोरोनावर मात करून पुन्हा सेवेत रूजू झाल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम पोलिसांसाठी स्वतंत्रपणे कोविड सेंटर सुरू केले होते.जिल्ह्यातील प्रमुख शहरांमध्ये वाहतुकीला शिस्त लागावी यासाठी सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्याचा उपक्रम त्यांनी रत्नागिरी शहरात राबविला होता. गुन्ह्यांची उकल तत्काळ व्हावी यासाठी त्यांनी स्वतंत्र पथक तयार केली होती. महिलाच्या छेडछाडीचे प्रकार रोखण्यासाठी दामिनी पथकाद्वारे कारवाई करण्यात येत होती. त्यामुळे महिला अत्याचाराच्या प्रकारात घट झाली होती.पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या पुराच्या वेळी डॉ. मुंढे यांनी स्थानिक संस्थांच्या माध्यमातून आवश्यक मदत पुरविली होती. कोरोनाच्या कालावधीत गरजू नागरिकांना त्यांनी घरगुती साहित्याचे वाटप केले होता. निसर्ग चक्रीवादळग्रस्तांना मदत करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला होता. पोलिसांमार्फत जम्बो मॅरेथॉन प्रथमच त्यांनी सुरु केली होती.नव्याने नियुक्ती झालेले डॉ. मोहित कुमार गर्ग हे गेले दोन वर्ष गडचिरोलीचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून सेवा बजावत आहेत. नक्षलग्रस्त भागात त्यांनी कायदा व सुव्यवस्था सुरळीत ठेवण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावली होती.