रत्नागिरी : गेल्या मार्च महिन्यापासून म्हणजे जवळजवळ सव्वा वर्ष कोरोना संकटामुळे घरात अडकलेल्या बालकांना आता घरात बसून कंटाळा आला आहे. त्यांना खेळायलाही बाहेर जाता येत नाही. ज्यांचे आई-वडील नोकरी-व्यवसायानिमित्त दिवसभर बाहेर असतात, अशांची मुले आता घरात राहून कंटाळली असून त्यांना आता आपल्या शाळेतील दोस्तांची आठवण प्रकर्षाने येऊ लागली आहे. त्यातच पावसाळा सुरू झाल्याने त्यांना नव्या दफ्तर आणि रेनकोट, छत्रीच्या खरेदीचेही वेध लागले आहेत.
गेल्या वर्षापासून शाळा-महाविद्यालये बंदच आहेत. त्यातच नर्सरीपासून ते चौथी-पाचवी या लहान वर्गातील मुले वर्षभर घरातच अडकली आहेत. सध्या ऑनलाइन वर्ग घेण्यात येत असले तरी काहींना त्यात फारसा रस वाटत नाही. आपल्या दोस्त मंडळींना त्यांना आता भेटायचे आहे, त्यांच्यासोबत शाळेत खेळायचे आहे, दंगा करायचा आहे, दप्तरे, नवीन पुस्तके एकमेकांना दाखवायची आहेत.
आता पावसाळा सुरू झाला आहे. त्यामुळे पुस्तकांची खरेदी काहींची झाली असली तरीही काहींना दफ्तरे, रेनकोट छत्र्या नव्या हव्या आहेत आणि त्या खरेदी करायला स्वत:च आई-बाबांसोबत जायचे आहे. त्यामुळे खरेदीचाच लकडा सुरू आहे. शाळांपासून दूर राहिलेल्या या बालकांना आता शाळा सुरू होण्याचे वेध लागले असून आपण शाळेत मास्क आणि सॅनिटायझर घेऊन जाणार असल्याचेही ते सांगतात.
शाळेत मला अभ्यास करण्यासाठी तसेच माझ्या मित्रांना भेटण्यासाठी मला शाळेत जायचे आहे. मला नवीन दप्तरही आणायचे आहे. सध्या कोरोना आहे. त्यामुळे शाळेत जाताना मास्क आणि सॅनिटायझरची बाटली घेऊन जाणार.
- शर्विल मंगेश साळवी (४थी), गणेशनगर, रत्नागिरी
मला ऑनलाइन शाळाही आवडते. पण आता मला शाळेत जायचंय. मला बाबांनी पुस्तके आणून दिलीत. दप्तरही आहे. रेनकोटही हवाय, पण बाहेर कसे जाणार? कोरोना आहे ना. शाळेत जाताना मास्क लावून जाणार, सॅनिटायझरची छोटी बाटली घेऊन जाणार.
- अथर्व अतुल कांबळे (३री), कुवारबाव, रत्नागिरी
कोरोना फार बदमाश आहे. आता तो जाऊ दे. मला घरात फार कंटाळा येतो. आई-बाबा घरात नसतात, त्यामुळे माझ्यासोबत खेळायला कुणीच नाहीत. म्हणून मला आता शाळेत जायचंय. ऑनलाइन शाळा मला नाही आवडत.
- विदिशा महेंद्र गावडे (२री), रत्नागिरी
मला शाळेत जाऊन मैत्रिणींना भेटायचे आहे. त्यांच्यासोबत खेळायचे आहे. अभ्यासही करायचा आहे. गावात माझ्यासोबत खेळायला कुणीच नाही. त्यामुळे आता मला फार कंटाळा आला आहे. शाळेत कधी जाते, असे झाले आहे.
- मनवा ऋषिकेश जोशी (४थी), शिरगांव, शिवरेवाडी, ता. रत्नागिरी