पैशाने खुर्ची मिळवता येते ज्ञान नाही : संजय यादव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:37 AM2021-09-08T04:37:02+5:302021-09-08T04:37:02+5:30
लांजा : पैशाच्या जोरावर नगराध्यक्षांनी खुर्ची मिळवली, तर लग्न होत नाही म्हणून आमदारांकडून बालहट्ट करून उपनगराध्यक्षांनी खुर्ची मिळवली. या ...
लांजा : पैशाच्या जोरावर नगराध्यक्षांनी खुर्ची मिळवली, तर लग्न होत नाही म्हणून आमदारांकडून बालहट्ट करून उपनगराध्यक्षांनी खुर्ची मिळवली. या खुर्चीचा उपयोग वैयक्तिक टीकाटिप्पणी करण्यासाठी न करता जनतेच्या विकासकामांसाठी करायला हवा होता, असा सनसनाटी टोला भाजपचे नगरसेवक व गटनेते संजय यादव यांनी नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांचे नावे न घेता लगावला आहे.
लांजा नगर पंचायतीच्या कार्यक्षेत्रातील जातीवाचक वाड्यांची व रस्त्यांची नावे बदलण्याचा अध्यादेश वाचून त्यावर नगरसेवकांनी प्रमुख गावकरी मंडळींना विश्वासात घेत नावात बदल करण्याचा निर्णय सर्वसाधारण बैठकीत घेतल्यानंतर भाजपचे नगरसेवक व गटनेते संजय यादव यांनी वाड्या व रस्त्यांच्या नावात बदल करण्याला विरोध करत जोरदार टीका केली होती. त्यांच्या टीकेला नगराध्यक्ष मनोहर बाईत यांनी उत्तर दिल्यानंतर भाजप नगरसेवकांनी नगराध्यक्षांवर टीका केली आहे. भाजपच्या नगरसेवकांनी जनतेशी चर्चा करून पुढील सभेमध्ये विषय घेण्यात यावा, अशी विनंती केली होती. परंतु, दि. २८ ऑगस्ट रोजी सत्ताधारी शिवसेनेने धुंदरे प्रभागातील सुतारवाडीचे नामकरण साईनगर करण्याची कार्यवाही करण्यासाठी पत्र दिले. ही गोष्ट लांजातील गाववाल्यांना विचारात न घेता केली, असे संजय यादव यांनी म्हटले आहे.
पॅनकार्ड, आधारकार्ड, रेशनकार्ड, मतदान कार्ड, बँक, जन्मापासून मृत्यूपर्यंतचे व इतर दफ्तरी ऐवज यावरील नोंद असलेल्या पत्त्यात बदल करण्यासाठी गाववाल्यांना किती परिश्रम घ्यावे लागतील, याचा अभ्यास नसल्याने ‘फक्त नामकरण करणे म्हणजे विकास नाही’ असा टाेलाही त्यांनी लगावला आहे.
जनतेला खोटे सांगू नका, जर तुम्ही नाव दिले नाहीत तर शासन आपल्या प्रभागाला वाडी-वस्तीला नाव ठरवेल, असे वक्तव्य करून जनतेची दिशाभूल करणे चुकीचे आहे. खरंच जर सत्ताधारी शिवसेना जनतेसोबत असेल तर त्यांनी जाहीर करावे की, आम्ही लांजा नगर पंचायत कार्यक्षेत्रातील कोणतीही नावे बदलणार नाही किंवा बदलू देणार नाही. पण असे ते करणार नाहीत. कारण ती क्षमता त्यांच्यात नाही, असे मत संजय यादव यांनी मांडले. यावेळी भाजप शहराध्यक्ष प्रमोद कुरूप, नाना शेट्ये, हेमंत शेटे, विजय कुरूप, मयूर शेडे, अशोक गुरव, शेखर सावंत, नगरसेवक मंगेश लांजेकर, शीतल सावंत, इक्बाल गिरकर उपस्थित होते.