मंडणगड : मंडणगड बाणकोट मार्गावरील शिपोळे ते वेसवी गावांच्या अंतरातील रस्त्यावर महामार्गानजीक असलेली माेरी खचली आहे. या खचलेल्या मोरीकडे सार्वजनिक बांधकाम खात्याने दुर्लक्ष केले आहे. या माेरीची वेळीच दुरुस्ती न झाल्यास पावसाळ्यात धाेका निर्माण हाेऊ शकताे.
बाणकोट सागरी पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक उत्तम पिठे यांनी याबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितले की, नादुरुस्त मोरीमुळे परिसरातील ग्रामस्थांची मोठी गैरसोय होणार आहे. गेल्या दोन वर्षांपासून मोरीचे बाजूचा रस्ता खचला आहे. येत्या पावसळ्यात पूर्ण रस्ता खचून मोरी नष्ट होण्याचा धोका आहे. यामुळे भविष्यात मोठ्या अपघाताची शक्यता आहे. या संदर्भात सार्वजनिक बांधकाम खात्याचे उपअभियंता अजयेंद्र कदम यांच्याकडे पत्रकारांनी संपर्क साधला असता त्यांनी मंडणगड कार्यालयाने मोरीच्या दुरुस्तीकरिता खात्याकडे प्रस्ताव पाठविल्याचे सांगितले. चिपळूण कार्यालयाकडून विलंब होत असल्याची माहिती दिली. पावसापूर्वी मोरीचे दुरुस्तीचे काम करण्याकरिता स्थानिक कार्यालय आग्रही असले तरी वरिष्ठ पातळीवरून या संदर्भात चालढकल होत आहे. पावसात मोरी व रस्ता बंद झाल्यास या विभागाचा तालुक्याशी असलेला संपर्क तुटण्याची भीती निर्माण झाली आहे.
............................
मंडणगड तालुक्यातील शिपोळे-वेसवी दरम्यानच्या नादुरुस्त मोरीची पोलीस निरीक्षक उत्तम पीठे यांनी पाहणी केली.