मुंबई काँग्रेसकडून पूरग्रस्तांसाठी अन्नधान्यासह डॉक्टरांची पथके येणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:32 AM2021-07-30T04:32:55+5:302021-07-30T04:32:55+5:30
राजापूर : रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांतील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुंबई काँग्रेसतर्फे जिल्हावार मदत अभियान हाती घेण्यात आले आहे. पूरपीडितांना अन्नधान्याच्या ...
राजापूर : रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांतील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुंबई काँग्रेसतर्फे जिल्हावार मदत अभियान हाती घेण्यात आले आहे. पूरपीडितांना अन्नधान्याच्या सामुग्रीसह वैद्यकीय तपासणीसाठी डॉक्टरांची पथके महाड, पोलादपूर, खेड, चिपळूण, संगमेश्वर तसेच राजापूर तालुक्यात येणार आहेत.
मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या मदत अभियानाची रुपरेखा आखण्यात आली. या बैठकीला मुंबई काँग्रेसचे कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा, आमदार अमिन पटेल, ज्येष्ठ नेते मधू चव्हाण, माजी खासदार हुसेन दलवाई, रवी राजा, चंद्रकांत हंडोरे, माजी मंत्री सुरेश शेट्टी, विधानपरिषदेच्या माजी सदस्य हुस्नबानू खलिफे आदींसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
कोकणात २२ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे चिपळूण, खेड, राजापूर येथे व्यापारी तसेच नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. चिपळूणमधील नुकसानाची तीव्रता भयावह आहे. बऱ्याच ठिकाणी ४८ तासांपेक्षा अधिक काळ पुराचे पाणी राहिल्याने सध्या चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. या चिखलामुळे आणि पुराच्या पाण्याने रोगराई पसरण्याची भीती आहे. यासाठी अन्नधान्याच्या जोडीला डॉक्टरांची पथकेही पूरपीडितांच्या तपासणीसाठी येणार आहेत. मुंबई काँग्रेसकडून नियोजन पूर्ण होताच येत्या दोन दिवसात ही पथके दोन्ही जिल्ह्यांत दाखल होणार आहेत.