पैशाच्या हव्यासापोटीच बँक व्यवस्थापकाचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2020 12:21 PM2020-09-19T12:21:39+5:302020-09-19T12:23:25+5:30
गुहागर तालुक्यातील वेलदूर येथील विदर्भ ग्रामीण बँकेच्या व्यवस्थापक सुनेत्रा सुनील दुर्गुळी (५८) यांचा पैशाच्या हव्यासापोटी वेलदूर नवानगर येथील दोघांनी खून केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. याप्रकरणी संजय श्रीधर फुणगूसकर (४०) व सत्यजित बबन पटेकर (३२) यांना पोलिसांनी अटक केली आहे.
गुहागर : तालुक्यातील वेलदूर येथील विदर्भ ग्रामीण बँकेच्या व्यवस्थापक सुनेत्रा सुनील दुर्गुळी (५८) यांचा पैशाच्या हव्यासापोटी वेलदूर नवानगर येथील दोघांनी खून केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. याप्रकरणी संजय श्रीधर फुणगूसकर (४०) व सत्यजित बबन पटेकर (३२) यांना पोलिसांनी अटक केली आहे.
गुरुवारी सकाळी नवानगर तरी जेटी येथे एका महिलेचे प्रेत पाण्यावर तरंगत असल्याचे दिसून आले. याबाबत पोलीस पाटील अरविंद पड्याळ यांनी गुहागर पोलीस ठाण्यात माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन मृतदेह बाहेर काढला. ही महिला वेलदूर विदर्भ ग्रामीण शाखेच्या व्यवस्थापक असल्याची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला.
सुनेत्रा दुर्गुळी या सायंकाळपासून बेपत्ता असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली. बुधवारी दुपारी त्या बँकेतून बाहेर पडल्यानंतर कोणासोबत कुठे गेल्या, शेवटचा संपर्क कुणाला केला याची माहिती घेतल्यानंतर संजय श्रीधर फुणगूसकर याच्यासोबत वेलदूर ते शृंगारतळी असा प्रवास केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसी खाक्या दाखवताच संजय फुणगूसकर व त्याचा साथीदार सत्यजित बबन पटेकर (३२) यांनी मिळून पैशासाठी खून केल्याचे स्पष्ट झाले.
संजय फुणगूस हा विदर्भ ग्रामीण बँक वेलदूर येथे सराफ म्हणून कामाला होता. बँक व्यवस्थापक सुनेत्रा दुर्गुळी व त्याची चांगली ओळख होते. पैशाच्या हव्यासापोटी दोघांनी दोरीने गळा आवळून खून केला. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी पायाला व कमरेला पिवळ्या नॉयलॉन दोरीने घट्ट बांधून रस्सीला दोन मोठे दगड बांधून नवानगर जेटीसमोर पाण्यात ढकलून दिले.
अवघ्या काही तासातच गुहागर पोलिसांनी उपविभागीय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बी. के. जाधव, किरणकुमार कदम, आनंदराव पवार तसेच रत्नागिरीच्या स्थानिक गुन्हे शाखा अन्वेषण शाखेच्या पथकाने शोध घेतला.