राजापूर : झालाच पाहिजे ... झालाच पाहिजे ... ग्रीन रिफायनरी प्रकल्प झालाच पाहिजे अशा गगनभेदी घोषणा देत शनिवारी प्रकल्प समर्थकांनी रिफायनरी प्रकल्पासाठी एल्गार पुकारला आहे. आम्हाला ग्रीन रिफायनरी प्रकल्प हवा आहे, तो आम्हाला मुख्यमंत्र्यांनी द्यावा, अशी मागणी करत डोंगर तिठा येथे समर्थनार्थ मोठे शक्तीप्रदर्शन केले आहे.आजपर्यंत ग्रीन रिफायनरी प्रकल्पासंदर्भात विरोधाची आंदोलने याच डोंगर तिठा येथे पहावयास मिळाली होती. मात्र, आज वेगळे चित्र पाहावयास मिळाले. कोकण बदलत असल्याचे यावरुन पुढे आले आहे. आज ग्रीन रिफायनरी प्रकल्प समर्थक कोकण जनकल्याण प्रतिष्ठानच्या माध्यमातून शेकडो जमीनदार उपस्थित होते.
या प्रकल्पासाठी आजपर्यंत कोकण विकास प्रतिष्ठानकडे या प्रकल्पभागातील सुमारे एक हजार पाचशे कुटुंबाचे सुमारे दोन हजार पाचशे सातबारे म्हणजेच ८ हजार एकरचे संमतीपत्र जमा झाली आहेत. ती संमतीपत्र सादर करत आम्हाला रिफायनरी प्रकल्प हवा आहे, असे यावेळी स्पष्ट केले.आम्ही गेले अनेक महिने याबाबत आमचे मत मांडण्यासाठी खासदार विनायक राऊत यांना विनंती केली होती. मात्र, त्यांनी आमचा आवाज दाबण्याचाच प्रयत्न केला. त्यामुळेच आम्हाला आज प्रसिद्धी माध्यमातून समोर यावे लागत आहे.
पूर्वी ज्या भागातून प्रकल्पाला विरोध केला जात होता ती नाणार, पाळेकरवाडी व दत्तवाडी या गावाना वगळण्यात आले आहे. त्यामुळे आता रिफायनरी प्रकल्पाला असणारा विरोध मावळला आहे. त्यामुळे आज शेकडो जमीनदार डोंगर तिठा येथे एकत्र आले होते. कोकणच्या विकासासाठी या ग्रीन रिफायनरी प्रकल्पाची गरज असून, शासनाने हा प्रकल्प येथे घोषित करावा अशी मागणी केली आहे.आम्ही दलाल नाहीआमचेच खासदार आम्हाला दलाल म्हणतात हे खूप खेदजनक असून, खरे दलाल कोण आहेत ते खासदारांनी शोधावे. जर आम्ही खरे जमीनदार आहोत जर दलाल असतो तर आम्हाला मुख्यमंत्र्यांच्या कोकण दौऱ्यात वेळ मिळवून दिली असती व आमचे म्हणणे मांडण्याची संधी दिली असती असा टोला शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष विलास अवसरे यांनी लगावला आहे.