भातशेतीसोबत नागली पिकेही गेली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2019 01:46 PM2019-11-05T13:46:25+5:302019-11-05T13:47:06+5:30
क्यार वादळामुळे ऐन दिवाळीत आलेल्या मुसळधार पावसाने भातशेतीसह नागली पिकेही आडवी झाली आहेत.
रत्नागिरी : क्यार वादळामुळे ऐन दिवाळीत आलेल्या मुसळधार पावसाने भातशेतीसह नागली पिकेही आडवी झाली आहेत.
आतापर्यंत झालेल्या पंचनाम्यांनुसार जिल्ह्यात २८ हजाराहून अधिक शेतकऱ्यांचे पावणेचार कोटींचे नुकसान झाले आहे. वादळसदृश वाऱ्यासह आलेल्या पावसाने शेती पूर्णपणे आडवी झाली आणि शेतात पाणी साचून राहिल्याने तयार भाताला पुन्हा कोंब फुटले.
भातशेतीबरोबरच नाचणी आणि ऊसाच्या शेतीलाही मोठा फटका बसला आहे. अतिवृष्टीने काही भागातील कापलेले भात आणि भातरहित गवतगंजी पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने मोठे नुकसान झाले. भातशेतीबरोबरच काही ठिकाणी ऊस लागवडही केली जाते.
पावसाबरोबर वादळी वाऱ्याने ऊस पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. भातशेतीबरोबरच ऊसाच्या नुकसानीचा पंचनामा करून भरपाई देण्याची मागणी शेतकरी करत आहेत.