नाव कोकणचे, विक्री कर्नाटक हापूसची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 02:56 PM2021-03-16T14:56:35+5:302021-03-16T14:58:22+5:30

Mango Ratnagiri-कोकणातून दररोज १० ते १२ हजार पेट्या आंबा वाशी मार्केटमध्ये विक्रीसाठी पाठविण्यात येत आहे. आवक वाढल्याने दर कमी झाला आहे. सध्या हजार ते चार हजार रुपये दराने आंबा पेटीची विक्री सुरू आहे. मात्र, कर्नाटकचा हापूस बाजारात येऊ लागला असून, मुंबईतील विक्रेत्यांकडून कोकणच्या नावाखाली कर्नाटक हापूसची विक्री करण्यात येत आहे. त्यामुळेही कोकणच्या हापूसला दराचा फटका बसला आहे.

Name of Konkan, sale of Karnataka Hapus | नाव कोकणचे, विक्री कर्नाटक हापूसची

नाव कोकणचे, विक्री कर्नाटक हापूसची

Next
ठळक मुद्देनाव कोकणचे, विक्री कर्नाटक हापूसची मुंबईतील विक्रेत्यांकडून होते ग्राहकांची फसवणूक

रत्नागिरी : कोकणातून दररोज १० ते १२ हजार पेट्या आंबा वाशी मार्केटमध्ये विक्रीसाठी पाठविण्यात येत आहे. आवक वाढल्याने दर कमी झाला आहे. सध्या हजार ते चार हजार रुपये दराने आंबा पेटीची विक्री सुरू आहे. मात्र, कर्नाटकचा हापूस बाजारात येऊ लागला असून, मुंबईतील विक्रेत्यांकडून कोकणच्या नावाखाली कर्नाटक हापूसची विक्री करण्यात येत आहे. त्यामुळेही कोकणच्या हापूसला दराचा फटका बसला आहे.

वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कोकणाबरोबर कर्नाटक राज्यातून आंबा विक्रीला येत आहे. कोकणच्या हापूसप्रमाणेच कर्नाटकचा हापूस दिसतो. मात्र चव, दर्जा व सालीमध्ये फरक आहे. कोकणातून हापूस कलमे नेऊन कर्नाटकमध्ये लागवड करण्यात आली असली तरी माती, पाणी तसेच हवामानामुळे फळांमधील वैशिष्ट्येही भिन्न आहेत. अर्थात हा फरक सर्वसामान्य ग्राहकांना ओळखता येणारा नाही. त्यामुळेच ग्राहकांची फसवणूक करून कोकण हापूसच्या नावावर कर्नाटकचा खपवला जात आहे.

कोकणातील हापूसची विक्री ५०० ते ८०० रुपये डझन दराने विक्री सुरू आहे. मात्र, कर्नाटकचा हापूस ७० ते ८० रुपये किलो दराने विकण्यात येत आहे. त्यामुळे विक्रेते दोन्ही प्रकारचा आंबा विकत घेतात. तुलनेने कर्नाटकचा आंबा जास्त घेतात. दोन्ही प्रकारचे आंबे एकाच वेळी पिकायला ठेवतात. आंबे पिकल्यानंतर ते पेटीत एकत्रित करून भरले जातात. कोकणचा हापूस सांगून कर्नाटक हापूसची विक्री करून पैसे मिळवत आहेत.

उच्चभ्रू ग्राहक

सुरुवातीला आंब्याचे दर अधिक असल्याने समाजातील उच्चभ्रू ग्राहक आंबा खरेदी करतो. मध्यमवर्गीय ग्राहक मात्र गुढीपाडव्यानंतर दर थोडे खाली आल्यानंतर आंबा खरेदी करतात. विक्रेते कर्नाटक व कोकणचा आंबा एकत्रित करून पद्धतशीर पेटीत भरतो. पेट्या तसेच दोन, एक डझनाचे बॉक्स भरले जातात. आंबे एकत्रित भरल्यामुळे ग्राहकांना आपली फसवणूक होत असल्याचा जराही अंदाज येत नाही. विक्रेता सांगेल ती किमत देऊन आंबा खरेदी केला जातो.


प्रक्रिया करणाऱ्या कंपन्यांमध्ये भेसळ

आंबा खरेदी करून आमरस व अन्य तत्सम उत्पादन करणाऱ्या कंपन्यांकडूनही कर्नाटक हापूसची खरेदी केली जाते. कोकणच्या हापूसमध्ये कर्नाटक हापूसची भेसळ करून पल्प तयार करण्याचे प्रकार सुरू आहेत. यावर निर्बंध लावणे गरजेचे आहे.

ग्राहकांची फसवणूक

कर्नाटकचा आंबा कोकणच्या तुलनेत खूप स्वस्त आहे. त्यामुळे तो अधिक संख्येने घेतला जातो आणि कोकणच्या हापूससोबत एकत्र करून विकला जातो. बाहेरून दोन्ही प्रकारचे आंबे सारखेच दिसतात. त्यामुळे ग्राहकांच्या माथी कर्नाटकचा आंबा मारून फसवणूक केली जाते. हा प्रकार दरवर्षीचा असून, यंदाही हीच स्थिती आहे.


कोकणच्या नावाने कर्नाटकचा हापूस आंबा विक्री केला जात असून, ग्राहकांची फसवणूक, शिवाय शेतकऱ्यांचे नुकसानही होत आहे. दोन्ही आंबे सारखे दिसत असल्याने निकष लावून फसवणूक रोखणे मोठे आव्हानात्मक काम आहे. कोकणच्या हापूसला भौगोलिक निर्देशांक प्राप्त झाले असतानाही होणारी फसवणूक रोखण्यासाठी लवकरच प्रयत्न करण्यात येणार आहेत.
- डॉ. विवेक भिडे,
अध्यक्ष, कोकण हापूस आंबा उत्पादक आणि उत्पादक विक्रेता सहकारी संघ

Web Title: Name of Konkan, sale of Karnataka Hapus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.