योजक असोसिएटसचे संस्थापक नाना भिडे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2020 05:23 PM2020-05-16T17:23:55+5:302020-05-16T17:26:15+5:30

कोकणातील दुर्लक्षित फळांवर संशोधन करून त्यापासून दर्जेदार प्रक्रिया उत्पादनांची निर्मिती करणारे योजक असोसिएट्सचे संस्थापक कृष्णा पर्शराम तथा नाना भिडे यांचे आज (१६ मे) सकाळी रत्नागिरीतील टिळक आळी येथील त्यांच्या निवासस्थानी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

Nana Bhide, founder of Yojak Associates, dies | योजक असोसिएटसचे संस्थापक नाना भिडे यांचे निधन

योजक असोसिएटसचे संस्थापक नाना भिडे यांचे निधन

Next
ठळक मुद्देयोजक असोसिएटसचे संस्थापक नाना भिडे यांचे निधनकोकणातील दुर्लक्षित फळांवर संशोधन, दर्जेदार प्रक्रिया उत्पादनांची निर्मिती

रत्नागिरी : कोकणातील दुर्लक्षित फळांवर संशोधन करून त्यापासून दर्जेदार प्रक्रिया उत्पादनांची निर्मिती करणारे योजक असोसिएट्सचे संस्थापक कृष्णा पर्शराम तथा नाना भिडे यांचे आज (१६ मे) सकाळी रत्नागिरीतील टिळक आळी येथील त्यांच्या निवासस्थानी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. कोकणातील फळप्रक्रिया उत्पादनांचे नाव त्यांनी देशातच नव्हे, तर जगाच्या बाजारपेठेपर्यंत पोहोचवले होते.

कोकणातल्या वाया जाणाऱ्या तरीही अमूल्य अशा विविध फळांचा उपयोग करून घेऊन त्यांनी त्यांना व्यवसायमूल्य मिळवून दाखविले. दुर्लक्षित कोकणी मेव्याचे आणि पर्यायाने कोकणाचे नाव उज्ज्वल करण्यात नाना भिडे यांचा मोलाचा वाटा आहे.

३ जून १९३१ रोजी सोमेश्वरच्या वेसुर्लेवाडीत (ता. जि. रत्नागिरी) नानांचा जन्म झाला. दुर्गम गावात सोयीसुविधांचा अभाव असतानाही रत्नागिरीत येऊन नानांनी जुन्या अकरावीपर्यंतचे शिक्षण घेतले. तेव्हा त्यांच्या वडिलांचा उपाहारगृहाचा व्यवसाय रत्नागिरी शहराच्या सध्याच्या गोखले नाक्यावर होता. खास कोकणी चवीसाठी हे भिडे उपाहारगृह तेव्हा प्रसिद्ध होते.

१९५० साली एसएससी झाल्यानंतर नानांनी वडिलांच्याच उपाहारगृहाच्या व्यवसायात पडायचे ठरविले. मात्र, काही कारणांनी उपाहारगृहाच्या जागेच्या मालकीचा प्रश्न निर्माण झाला. त्याबाबतचा खटला १९५० ते १९६० अशी दहा वर्षे उच्च न्यायालयात चालला.

अखेर भिडे यांच्या बाजूने निर्णय झाला. त्यामुळे नव्या उमेदीने नानांनी तो व्यवसाय पुढे सुरू ठेवायचे निश्चित केले. त्यानंतर आंबा, काजू, करवंद, कोकम, फणस या दुर्लक्षित कोकणी मेव्याकडेच लक्ष द्यायचे नानांनी निश्चित केले आणि १९८० साली योजक असोसिएट्स संस्थेची स्थापना केली.

योजकमार्फत त्यांनी सर्वप्रथम कोकम सरबताचे व्यावसायिक उत्पादन बाजारात आणले. करवंद, जांभूळ, कुडा या वनस्पतीची फुले, नाचणी, डोंगरी आवळा इत्यादी रानमेव्यावर प्रक्रिया करण्याचे त्यांचे सर्व प्रयोग यशस्वी झाले. करवंद वडी, जॅम, कुडाफूल सांडगा, जांभूळ ज्यूस, नाचणी सत्त्व, आवळा सरबत, जॅम, पेठा, मावा अशी अनेक दर्जेदार उत्पादने त्यांनी घेतली. २००० साली केवळ वाळवणासाठी तीन भव्य शेड्स त्यांनी पावसजवळच्या गोळप इथल्या माळरानावर उभारल्या.

या उद्योगांमध्ये शंभराहून अधिक लोकांना रोजगार मिळालाच, पण त्याहीपेक्षा शेतकऱ्यांना त्यांच्या वाया जाणाऱ्या रानमेव्याची चांगली किंमत मिळाली. योजक संस्थेकडून प्रेरणा घेऊन आता गावोगावीही अनेक प्रक्रिया उद्योग सुरू झाले आहेत. नानांच्या निधनामुळे कोकणातील फलोत्पादन आणि प्रक्रिया उद्योगाला दिशा देणारा कल्पक उद्योजक हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.

 

Web Title: Nana Bhide, founder of Yojak Associates, dies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.