नाणार प्रकल्पाला सर्वांचाच विरोध नाही, निवेदनात समितीने केले नमूद
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2019 05:24 AM2019-02-08T05:24:35+5:302019-02-08T05:24:49+5:30
राजापूर तालुक्यातील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाला १00 टक्के लोकांचा विरोध आहे, असे चित्र निर्माण केले जात असले, तरी आम्हाला प्रकल्प हवा आहे, अशी भूमिका अनेक ग्रामस्थ व व्यावसायिकांनी घेतली आहे.
रत्नागिरी : राजापूर तालुक्यातील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाला १00 टक्के लोकांचा विरोध आहे, असे चित्र निर्माण केले जात असले, तरी आम्हाला प्रकल्प हवा आहे, अशी भूमिका अनेक ग्रामस्थ व व्यावसायिकांनी घेतली आहे. उच्चस्तरीय समितीचे अध्यक्ष द. म. सुकथनकर यांनी आपल्या निवेदनात ही बाब अधोरेखित केली आहे. जवळपास २0 टक्के लोकांनी आपली जमीन प्रकल्पाला देण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतली आहे.
राजापूर तालुक्यातील नाणार, सागवे परिसरातील १४ गावांमध्ये आणि सिंधुदुर्गातील देवगड तालुक्यातील दोन गावांमध्ये रिफायनरी प्रकल्प प्रस्तावित आहे. त्यासाठी तीन पेट्रोलियम कंपन्यांनी एकत्र येऊन रत्नागिरी रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स कंपनी स्थापन केली आहे. या प्रकल्पाला सर्व ग्रामस्थांचा विरोध आहे, असेच चित्र आतापर्यंत समोर येत होते. मात्र या प्रकल्पाला पाठिंबा देणारे ग्रामस्थही आहेत.
सुकथनकर समितीच्या बैठकीच्या पहिल्या सत्रात अनेक संघटना, संस्थांचे लोक समितीला भेटून आपले म्हणणे सादर करून गेले. त्यात डॉक्टर्स, वकील, बागायतदार, व्यापारी, हॉटेल मालक, आयटीआय विद्यार्थी यांचा समावेश होता. त्यांनी दिलेल्या निवेदनांचा सूर हा प्रकल्प उभारणीस अनुकुल आणि समर्थनीय होता, असे सुकथनकर यांनी सांगितले.
मात्र प्रकल्प ज्या गावांमध्ये येत आहे, तेथील ग्रामपंचायतींनी प्रकल्प नको, असे ठराव केले आहेत.