नवरात्रोत्सवास सर्वत्र प्रारंभ, निर्बंध तरी उत्साह कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2020 06:16 PM2020-10-17T18:16:22+5:302020-10-17T18:17:12+5:30
अश्विन शुध्द प्रतिपदेला अर्थात् नवरात्रोत्सवास शनिवारपासून सर्वत्र प्रारंभ झाला आहे. जिल्ह्यात ठिकठिकाणी ३६४ दुर्गामातेची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. यावर्षी कोरोनाचे सावट असल्याने नवरोत्सव शांततेत व साधेपणाने साजरा करण्यात येत आहे. नवरात्रोत्सवावर निर्बंध घालण्यात आले असले तरी उत्साह कायम आहे.
रत्नागिरी : अश्विन शुध्द प्रतिपदेला अर्थात् नवरात्रोत्सवास शनिवारपासून सर्वत्र प्रारंभ झाला आहे. जिल्ह्यात ठिकठिकाणी ३६४ दुर्गामातेची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. यावर्षी कोरोनाचे सावट असल्याने नवरोत्सव शांततेत व साधेपणाने साजरा करण्यात येत आहे. नवरात्रोत्सवावर निर्बंध घालण्यात आले असले तरी उत्साह कायम आहे.
नवरात्रोत्सवातही कोरोनाचे विघ्न आले असून, मंदिरात गर्दी टाळण्यासाठी सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. केवळ मंदिरांमध्ये धार्मिक विधी करण्यात येणार आहेत. राजापूर तालुक्यातील आडिवरे, रत्नागिरीतील भगवती मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात आली आहेत. सकाळच्या वेळेत केवळ धार्मिक विधीसाठी मोजके लोक उपस्थित होते.
नवरात्रोत्सवामध्ये नऊ दिवस केवळ धार्मिक कार्यक्रमांचे नियोजन यावर्षी करण्यात आले असून तेही मोजक्याच व्यक्तींच्या उपस्थितीत पार पाडले जाणार आहेत. जिल्ह्यात ९२ ठिकाणी देवीच्या फोटोंचे पूजन करण्यात आले. ३७ हजार ५५९ ठिकाणी खाजगी तर २४९ ठिकाणी सार्वजनिक घटस्थापना करण्यात आली आहे. जिल्ह्यात यावर्षी ३६४ ठिकाणी दुर्गामातेच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे.
यावर्षी मिरवणुका, म्युझिक सिस्टिमला बंदी असल्याने कोणताही गाजावाजा उत्सवात नाही. शिवाय प्रतिष्ठापनेसाठीही मोजके भाविक उपस्थित होते. भाविकांच्या आरोग्याची काळजी घेत असताना, मंडपात सॅनिटायझर उपलब्ध करून ठेवण्यात आले असून, मंडपात प्रवेश करणाऱ्यांसाठी मास्क सक्तीचा आहे. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना सोशल डिस्टन्सिंग ठेवण्याची सूचना करण्यात येत आहे.