राष्ट्रवादी काँग्रेसचा मोर्चा रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:29 AM2021-03-24T04:29:40+5:302021-03-24T04:29:40+5:30
लोटे येथील घरडा कंपनीवर काढण्यात येणाऱ्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर गेटबाहेर पोलिसांच्या गाड्या तैनात करण्यात आल्या होत्या. (छाया : सुनील आंब्रे) ...
लोटे येथील घरडा कंपनीवर काढण्यात येणाऱ्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर गेटबाहेर पोलिसांच्या गाड्या तैनात करण्यात आल्या होत्या. (छाया : सुनील आंब्रे)
......................................
लोकमत न्यूज नेटवर्क
आवाशी : लोटे-परशुराम येथील घरडा केमिकल कंपनीत झालेल्या स्फोटाच्या निषेधार्थ व कंपन्यांना सुरक्षेच्यादृष्टीने ठोस उपाययोजना करण्यासाठी देण्यात येणाऱ्या इशाऱ्याच्या अनुषंगाने खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आयोजित केलेला मोर्चा रद्द करण्यात आला.
औद्योगिक वसाहतीतील घरडा केमिकल्स कंपनीत शनिवार दि. २० रोजी स्फोटामुळे लागलेल्या आगीत चार अधिकाऱ्यांचा होरपळून मृत्यू झाला, तर एकजण गंभीररित्या भाजला. या पार्श्वभूमीवर कंपनीकडून झालेल्या हलगर्जीपणाचा निषेध व कामगारांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा ठपका ठेवत संबंधितांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे माजी आमदार संजय कदम यांनी मोर्चाची घोषणा केली होती. या मोर्चात खेडचे नगराध्यक्ष व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस वैभव खेडेकरही आपल्या सहकाऱ्यांसमवेत सहभागी होणार होते.
याबाबत माजी आमदार संजय कदम यांच्याशी भ्रमणध्वनीवरुन संपर्क साधला असता पक्षाच्या नेत्या व कामगार राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी एमआयडीसी, एमपीसीबी कोल्हापूर येथील सुरक्षा विभाग यांना या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे व सुरक्षा विभागाचे कार्यालय लवकरच लोटे येथे कार्यान्वित करण्याचे आदेश दिले आहेत. त्यांच्या सूचनेवरुन व आदेशावरुन मोर्चा स्थगित करण्यात आल्याचे कदम यांनी यावेळी सांगितले.