मंडणगड : नैसर्गिक आपत्ती व मेडिकल इमर्जन्सी व अन्य सर्वप्रकारच्या आपत्तीचे व्यवस्थापन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून तालुका पातळीवर रेस्क्यू टीमच्या माध्यमातून युवकांचे संघटन कार्यरत ठेवणार असल्याचे प्रतिपादन माजी आमदार संजय कदम यांनी मंडणगड येथे केले.
पक्षाच्या शहरातील कार्यालयात तालुक्यातील पत्रकारांना मास्क, सॅनिटायझर, व्हेपोरायझर या वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी त्यांनी तालुक्यातील आरोग्य सुविधांचा आढावा घेतला व विविध समस्यांचे निवारण करण्याकरिता शक्य ती मदत करण्याचे आश्वासनही दिले. यावेळी ते म्हणाले की, राष्ट्रवादी रेस्क्यू टीम तालुकावासीयांना विविध समस्यांमध्ये मदत करणार आहे. याकरिता पक्षातील पन्नासहून अधिक युवा व सक्षम कार्यकर्त्यांची टीम उभी करण्यात आली आहे. तसेच गरज भासेल तेव्हा ज्येष्ठ कार्यकर्त्यांची मदत घेतली जाणार असून, मदतकार्यासाठी आवश्यक साधनसामुग्री तालुका पातळीवर उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते भाई पोस्टुरे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश शिगवण, युवराज जाधव, राहुल कोकाटे, राकेश साळुंखे, रुपेश साळुंखे, सुभाष सापटे, सर्फराज चिपोलकर, अंकुश सावर्डेकर, सुधीर हातमकर यांच्यासह पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
ग्रामीण रुग्णालयाला दहा बेड्स
ग्रामीण रुग्णालयात कोविड रुग्णालय सुरु करण्यात आले आहे. तेथे दहा बेड्स कमी पडत असल्याची बाब निर्दशनाला आणून दिल्यावर तालुक्याला दहा बेड्स व नजीकच्या काळात तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींना किमान प्रत्येकी १० पीपीई किट तसेच सॅनिटायझर उपलब्ध करुन देण्यात येईल, असे माजी आमदार संजय कदम यांनी सांगितले.
----------------------
मंडणगड तालुक्यातील पत्रकारांना माजी आमदार संजय कदम यांच्या हस्ते मास्क, सॅनिटायझर, व्हेपोरायझरचे वाटप करण्यात आले.