पर्यटनवृध्दीसाठी रत्नागिरीला नवा लूक : उदय सामंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 08:30 PM2021-03-01T20:30:54+5:302021-03-01T20:33:33+5:30
Thiba Palace Tourisam Ratnagiri- पर्यटनाच्या दृष्टीने रत्नागिरी शहर राज्यातील नामवंत शहर व्हावे, यासाठी . जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सच्या माध्यमातून हा बदल केला जाणार आहे. त्यासाठी आवश्यक निधी विविध खात्यांच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
रत्नागिरी : पर्यटनाच्या दृष्टीने रत्नागिरी शहर राज्यातील नामवंत शहर व्हावे, यासाठी शहराला नवा लूक देण्याचा प्रयत्न असून, साळवी स्टॉप ते मांडवी व शहरांतर्गत असलेले चौक वेगळ्या पद्धतीने विकसित करण्याचा मानस आहे.
जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सच्या माध्यमातून हा बदल केला जाणार आहे. त्यासाठी आवश्यक निधी विविध खात्यांच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्यापूर्वी जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सचे तज्ज्ञ प्राध्यापक रत्नागिरीत दाखल झाले होते. त्यांनी थिबा राजवाड्याची पाहणी केली. थिबा राजवाड्यात जे. जे. स्कूल ऑफ आर्ट म्युझियम करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
त्याचा पाठपुरावा करण्यासाठी पुन्हा जे. जे. स्कूल ऑफ आर्टचे तज्ज्ञ प्राध्यापक रत्नागिरी शहरात आले आहेत. त्यांनी थिबा राजवाड्यासह शहरातील मुख्य चौकात मारुती मंदिर सर्कल, श्यामराव पेजे पुतळा, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, सावरकर चौक, मांडवी जेटी आदींची पाहणी केली.
मारुती मंदिर सर्कल सुशोभिकरणासाठी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. चौकांच्या सुशोभिकरणासाठी पर्यटन, जिल्हा नियोजन त्या माध्यमातून निधी उपलब्ध करून कामाला सुरुवात केली जाणार आहे.
टाकाऊपासून कायमस्वरूपी रेखीव काम जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सचे विद्यार्थी शहरात करणार आहेत. या सर्वांच्या माध्यमातून शहराला नवा लूक दिला जाणार आहे. शहरात येणाऱ्या पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी नाविन्यपूर्ण शहर होणार असल्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
थिबा राजवाडा जतन, संवर्धनाचे काम थांबले आहे. पुरातत्त्व विभागातर्फे या कामाला गती देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना पाठपुरावा करण्याची सूचना मंत्री उदय सामंत यांनी केली आहे.
वैयक्तिक कारण
राज्यातील लोणेरे, जळगाव येथील दोन विद्यापीठाच्या कुलगुरूंनी राजीनामा त्यांच्या वैयक्तिक अडचणीमुळे दिला असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. गेले वर्षभर ते राजीनामा देण्याच्या तयारीत होते. राजकीय हस्तक्षेपामुळे कुलगुरूंनी राजीनामा दिला हे आरोप चुकीचे व खोडसाळ आहे. त्यावरून राजकारण करणे चुकीचे आहे, असेही त्यांनी सांगितले.